मुंबई, 2 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या टेस्ट सीरिजनंतर 5 टी-20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे. वनडे सीरिजमधून रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांना विश्रांती देण्यात येईल, असं वृत्त आहे. हे तीन खेळाडू वनडे सीरिजमध्ये नसतील तर कोणाला संधी देण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी स्पिनर ब्रॅड हॉग (Brad Hogg) याने वनडे टीममध्ये अश्विनला (Ashwin) संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये अश्विन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हॉग म्हणाला, अश्विनला वनडे टीममध्ये स्थान द्यायचा निर्णय योग्य असेल. अश्विनला संधी दिली तर खालच्या क्रमांकापर्यंत बॅटिंगचा पर्याय उपलब्ध राहिल. अश्विन विकेट घेणारा आणि कमी रन देणारा बॉलर आहे, असं हॉग म्हणाला.
अश्विनने 77 टेस्ट मॅचशिवाय 111 वनडे आणि 46 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. मागच्या काही वर्षांपासून तो भारताच्या वनडे आणि टी-20 टीममध्ये नाही. जून 2017 साली अश्विन शेवटची वनडे खेळला होता. पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर भारताने स्पिनर्सबाबतची रणनीती बदलली. अश्विन आणि जडेजाऐवजी युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना खेळवण्यात आलं. पण कुलदीपचा फॉर्म ढासळल्यामुळे पुन्हा एकदा अश्विनच्या पुनरागमनाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजनंतर 23 मार्चपासून 3 वनडे मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे. या तिन्ही मॅच पुण्यामध्ये होणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Sports