चेन्नई, 14 फेब्रुवारी : आर.अश्विनच्या (R. Ashwin) फिरकीपुढे इंग्लंडच्या बॅट्समननी (India vs England) लोटांगण घातलं आहे. अश्विनने घेतलेल्या 5 विकेटच्या जोरावर इंग्लंडचा 134 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे भारताला 195 रनची मोठी आघाडी मिळाली. अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये 29व्यांदा 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) ला शून्य रनवर माघारी धाडत अश्विनने इंग्लंडच्या टीमचा ऑल आऊट केला. ब्रॉडची विकेट घेताच अश्विनने नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
टेस्ट क्रिकेटमध्ये 200 डावखुऱ्या बॅट्समनना आऊट करणारा अश्विन पहिलाच बॉलर ठरला आहे. अश्विनने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक दिग्गज डावखुऱ्या बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये डेव्हिड वॉर्नरला 10 वेळा, एलिस्टर कूक आणि बेन स्टोक्सला 9 वेळा आणि एड कोवेन आणि जेम्स अँडरसनला प्रत्येकी 7 वेळा आऊट केलं आहे.
घरच्या मैदानातल्या 45 टेस्टमध्ये अश्विनने 23व्यांदा इनिंगमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या. जेम्स अँडरसनच्या 89 टेस्टमध्ये 22 पाच विकेटचा विक्रम अश्विनने मोडीत काढला. आता अश्विनच्या पुढे मुरलीधरन (45), रंगना हेराथ (26) आणि अनिल कुंबळे (25) आहेत.
ब्रॉडचा नकोसा विक्रम
दुसरीकडे अश्विनने विकेट घेताच ब्रॉडच्या नावावरही नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये स्टुअर्ट ब्रॉड 36व्यांदा शून्य रनवर आऊट झाला. ग्लेन मॅक्ग्राचं 35 डकचं रेकॉर्ड ब्रॉडने मोडीत काढलं. तसंच त्याने क्रिस मार्टिनच्या रेकॉर्डशीही बरोबरी केली आहे. आता ब्रॉडच्या पुढे फक्त कोर्टनी वॉल्श आहे. कोर्टनी वॉल्श टेस्ट क्रिकेटमध्ये 43 वेळा शून्य रनवर आऊट झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.