अहमदाबाद, 20 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 मॅचमध्ये भारताचा (India vs England) 36 रनने दणदणीत विजय झाला आहे, याचसोबत भारताने 5 मॅचची ही मालिकाही 3-2ने खिशात टाकली आहे. भारताने ठेवलेल्या 225 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 188 रन करता आल्या. शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर भुवनेश्वर कुमारला 2 विकेट मिळाली. तर हार्दिक पांड्या आणि टी.नटराजन यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडकडून डेव्हिड मलानने 46 बॉलमध्ये सर्वाधिक 68 रन केले. जॉस बटलरने 34 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली. भारताने ठेवलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरूवातीलाच धक्का लागला. जेसन रॉय शून्य रनवर माघारी परतला.
त्याआधी विराट कोहली, (Virat Kohli) रोहित शर्माचं (Rohit Sharma) अर्धशतक आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फटकेबाजीमुळे भारताने इंग्लंडला 225 रनचं आव्हान दिलं. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा ओपनिंगला आले. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 9 ओव्हरमध्ये 94 रनची पार्टनरशीप झाली. रोहित शर्मा 34 बॉलमध्ये 64 रन करून आऊट झाला, तर विराट कोहली 52 बॉलमध्ये 80 रनवर नाबाद राहिला. सूर्यकुमार यादवने 17 बॉलमध्ये 32 रन केले आणि हार्दिक पांड्याने 17 बॉलमध्ये नाबाद 39 रनची खेळी केली. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि बेन स्टोक्सला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
या मॅचमध्ये भारताने फॉर्ममध्ये नसलेल्या केएल राहुलला (KL Rahul) बाहेर बसवण्यात आलं, तर फास्ट बॉलर टी.नटराजनला संधी देण्यात आली. तर इंग्लंडने मात्र टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.
पहिल्या टी-20 मध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला, तर तिसरी मॅच पुन्हा इंग्लंडने जिंकली. चौथ्या मॅचमध्ये भारताने पुनरागमन करत विजय मिळवला. टी-20 सीरिजनंतर आता 23 मार्चपासून पुण्यात तीन वनडे मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, Kl rahul