मुंबई, 23 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्धची पहिली टेस्ट मोठ्या फरकानं पराभूत झालेल्या टीम इंडियासाठी (Team India) आणखी एक काळजीची बातमी आहे. भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीला (Mohammed Shami) सहा आठवड्यांच्या विश्रांतीची गरज आहे.त्यामुळे ऑस्ट्रेलिया सीरिजपाठोपाठ इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या टेस्टमधूनही (IND vs ENG) शमी आता जवळपास आऊट झाला आहे.
शमीला काय झाले?
मोहम्मद शमीला अॅडलेड टेस्टच्या तिसऱ्या दिवशी सकाळी दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सचा (Pat Cummins) बाऊन्सर शमीच्या हाताला लागला होता. हाताला बॉल लागल्यानंतर काही क्षणातच शमी रिटायर झाला. त्यामुळे भारताची दुसरी इनिंग 9 आऊट 36 रन्सवर संपुष्टात आली. भारताचा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील हा निचांकी स्कोअर आहे.
मोहम्मद शमीच्या दुखापतीची डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला सहा आठवड्यांचा विश्रांतीची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या टेस्टमध्येही शमी खेळण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शमीला बरं होण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. सध्या त्याच्या हातावर प्लॅस्टर असून ते प्लॅस्टर काढल्यानंतर तो बंगळुरुतील एनसीएमध्ये (NCA) काही काळ सराव करेल’.
(हे वाचा-2020 ची सर्वोत्तम टी-20 टीम, विराट नाही तर या दोन भारतीयांचा समावेश)
भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्ट या चेन्नईत तर नंतरच्या दोन टेस्ट या अहमदाबादमध्ये होणार आहेत. आयसीसी टेस्ट क्रिकेट चॅम्पियनशीची (ICC Test Cricket Championship) फायनल गाठण्यासाठी भारताला इंग्लंड विरुद्धची सीरिज मोठ्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे शमीचा पहिल्या टेस्टमधील सहभाग अनिश्चि्त असल्यानं टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे.
शमीच्या जागी कोण?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टेस्ट ही 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरु होत आहे. या टेस्टमध्ये शमीच्या जागी मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) किंवा नवदीप सैनीचा (Navdeep Saini समावेश होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket