अयोध्या प्रकरणाचे टीम इंडियावर पडसाद! विराट सेनेच्या सुरक्षेत होणार वाढ

अयोध्या प्रकरणाचे टीम इंडियावर पडसाद! विराट सेनेच्या सुरक्षेत होणार वाढ

टीम इंडियाच्या सुरक्षेत होणार वाढ, अयोध्या प्रकरणानं वाढवली विराट सेनेची चिंता.

  • Share this:

इंदूर, 08 नोव्हेंबर : देशातीस अतिसंवेदनशील अशा अयोध्या प्रकरणाचा येत्या 7 ते 8 दिवसात निकाल लागणार आहे. यादृष्टीनं देशभरात ठिकठिकाणी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशात शांततेचं वातावरण ठेवा. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल त्याचा आदर ठेवा, असं आवाहन केले होते. त्यामुळं सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान देशभरात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळं इंदूरमध्ये भारत-बांगलादेश यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. 14 नोव्हेंबरपासून भारत-बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे. यासाठी इंदूर पोलिसांनी विशेष सुरक्षा तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले.

अयोध्या प्रकरणी 17 नोव्हेंबरआधी निकाल लागू शकतो. त्यामुळं 14पासून सुरू होणाऱ्या या सामन्या दरम्यान शहरात शांततेचे वातावरण असावे, म्हणून सुरक्षा वाढवण्यात येणार असल्याचे इंदूर वरिष्ठ पोलिस अधिक्षक रुचिवर्धन मिश्रा यांनी सांगितले. मिश्रा यांनी, “अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणार असल्यामुळं संपूर्ण शहराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळं शहरात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आहे. त्यामुळं भारत-बांगलादेश सामन्याची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. इंदूरच्या मैदानाची क्षमता 27 हजार प्रेक्षकांसाठी आहे. त्यामुळं जवळ जवळ एक हजार पोलिस तैनात करण्यात येणार आहे”, असे सांगितले.

याआधी 2007-2008मध्ये झालेल्या दंगलीमध्ये इंदूर शहरात अशांतता परसली होती. त्यामुळं रामजन्मभूमीप्रकरणी पोलिसांनी सुरक्षा तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि बांगलादेश दोन्ही खेळाडूंना पहिल्या दिवसांपासून सुरक्षा असणार आहे. हॉटेलमध्येही पोलिस त्यांच्यासोबत असतील. तसेच, मिश्रा यांनी या दरम्यान कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही स्पष्ट केले आहे.

17 नोव्हेंबरपर्यंत निकाल

पुढील महिन्यात 17 तारखेपर्यंत वादग्रस्त 2.77 एकर जागेसंदर्भात अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. 17 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधिश रंजन गोगोई निवृत्त होत आहे. न्या.गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठ या प्रकरणाची सुनावणी करत आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आणि सण यामुळे जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010मध्ये निर्णय दिला होता. त्या निर्णयाविरुद्ध 14 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. यासर्व याचिकांवर एकत्र सुनावणी सध्या सुरू आहे. या घटनापीठात न्या.एस.ए.बोबडे, न्या.डी.वाय.चंद्रचूड, न्या.अशोक भूषण, न्या. एस.ए.नजीर यांचा समावेश आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त 2.77 एकर जागा चार भागात वाटली होती.

First published: November 8, 2019, 7:27 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading