ऍडलेड, 20 डिसेंबर : ऍडलेड टेस्टमध्ये भारताविरुद्ध शानदार विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलिया (India vs Australia) टीमसाठी वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रतिभावान युवा खेळाडू विल पुकोवस्की (Will Pucovski) च्या डोक्याला झालेली दुखापत अजूनही ठीक झालेली नाही. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार अजूनही पुकोवस्कीचं डोकं दुखत आहे, त्यामुळे 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये तो खेळणार का नाही याबाबत साशंकता आहे.
व्हिक्टोरियन क्रिकेटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोक्याला लागलेल्या बॉलचा अजूनही पुकोवस्कीला त्रास होतो आणि त्याला चक्करही येते. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या सराव सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये पुकोवस्कीच्या डोक्याला बॉल लागला. इनिंगच्या 13 व्या ओव्हरदरम्यान कार्तिक त्यागीने टाकलेला बाऊन्सर बॉल पुकोवस्कीला खेळता आला नाही. यानंतर पुकोवस्की मैदानातच कोसळला आणि रिटायर्ड हर्ट होऊन ड्रेसिंग रूममध्ये गेला. या दुखापतीमुळे तो दुसरा सराव सामना आणि पहिली टेस्टही खेळू शकला नाही.
पुकोवस्कीला 9 वेळा दुखापत
22 वर्षीय पुकोवस्कीने पहिल्या सराव सामन्यात एक आणि 23 रन केले होते. याआधीही पुकोवस्की त्याच्या कारकिर्दीत कनकशन (डोक्याची दुखापत) मुळे बाहेर होता. सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार पुकोवस्की आतापर्यंत 9 वेळा दुखापतग्रस्त झाला आहे. यावर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तो लागोपाठ दोन द्विशतकं करणारा खेळाडू होता. फॉर्ममध्ये असल्यामुळे तो या सीरिजमध्ये खेळेल, असं निश्चित मानलं जात होतं. पण 13 दिवसानंतरही पुकोवस्की सरावासाठी मैदानात उतरलेला नाही.
वॉर्नरचं पुनरागमन
ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅट्समन डेव्हिड वॉर्नर दुसरी टेस्ट खेळण्यासाठी मेलबर्नला पोहोचला आहे. वनडे सीरिजदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो टी-20 आणि पहिल्या टेस्टला मुकला होता. पहिल्या टेस्टसाठी वॉर्नर आणि पुकोवस्की नसल्यामुळे ऑस्ट्रेलिया जो बर्न्स आणि मॅथ्यू वेडसोबत मैदानात उतरली होती. वेडने पहिल्या इनिंगमध्ये 8 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 33 रन केले, तर बर्न्सने दुसऱ्या इनिंगमध्ये शानदार 51 रनची अर्धशतकी खेळी केली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिल्या टेस्टमध्ये विजय झाला. वॉर्नरचं पुनरागमन झालं, तर वेडला जागा खाली करावी लागेल.