मुंबई, 21 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ऐतिहासिक कामगिरी करून टीम इंडियाचे (India vs Australia) खेळाडू भारतात परतले आहेत. मुंबईमध्ये दाखल झालेल्या खेळाडूंचं विमानतळावरच जंगी स्वागत करण्यात आलं. काल ऑस्ट्रेलियामधून निघालेलं टीम इंडियाच्या खेळाडूंचं विमान दुबईमार्गे मुंबईत दाखल झालं. मुंबईत आल्यानंतर खेळाडूंना क्वारंटाईन व्हावं लागणार का? याबाबत गोंधळ होता. कारण नियमांनुसार युरोप, दक्षिण आफ्रिका आणि मध्य-पूर्व देशांमधून आलेल्या प्रवाशांसाठी 14 दिवसांचा क्वारंटाईन बंधनकारक आहे.
दुबईमार्गे मुंबईत आल्यामुळे खेळाडूंना क्वारंटाईन व्हावं लागलं असतं तर त्यांना इंग्लंडविरुद्धची पहिली टेस्ट मुकावी लागली असती, पण खेळाडूंना क्वारंटाईनच्या नियमांमधून दिलासा देण्यात आला. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'क्रिकेटपटू ज्या ठिकाणी गेले त्याप्रत्येक ठिकाणी त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. या सगळ्यांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या. खेळाडूंचं विमान कुठेही बदलेलं नाही, दुबईवरून येताना खेळाडूंनी त्याच विमानाने प्रवास केला. खेळाडूंना कोणतीही सूट देण्यात आली नाही. त्यांनाही होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत,' अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
आमच्या वॉर रूममधून दर तीन तासांनी त्यांची माहिती घेतली जाईल, त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
शरद पवारांची मध्यस्थी
ऑस्ट्रेलिया दौरा संपवून अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवी शास्त्री, शार्दुल ठाकूर आणि पृथ्वी शॉ मुंबईत आले. खेळाडूंना क्वारंटाईन करावं का नाही? याबाबत काल दिवसभर संभ्रमाचं वातावरण होतं, पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शरद पवार यांनी काल रात्री उशीरा सूत्र हलवली. शरद पवारांनी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेतले वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा केली, यानंतर खेळाडूंना क्वारंटाईनमधून दिलासा मिळाला, अशी माहिती एमसीएच्या सूत्रांनी दिली.
नियमांनुसार कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे युरोप, दक्षिण आफ्रिका आणि मध्य पूर्व देशांमधून येणाऱ्यांना 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन आणि 7 दिवस घरीच क्वारंटाईन व्हावं लागतं. भारतीय खेळाडू जर क्वारंटाईन झाले असते, तर त्यांना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये खेळता आलं नसतं, कारण त्यांचा क्वारंटाईन कालावधी आणि इंग्लंडविरुद्धची टेस्ट एकाच दिवशी 5 फेब्रुवारीला सुरू होणार होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.