IND vs AUS : ...म्हणून चाहते शास्त्री नाही तर द्रविडला करतायत सलाम!

IND vs AUS : ...म्हणून चाहते शास्त्री नाही तर द्रविडला करतायत सलाम!

ऑस्ट्रेलियासाठी अभेद्य असलेला गाबाचा किल्ला भारतीय टीमने (India vs Australia) जिंकला. याचसोबत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्येही (Border-Gavaskar Trophy) भारताचा 2-1 ने विजय झाला. यानंतर राहुल द्रविड (Rahul Dravid) याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : ऑस्ट्रेलियासाठी अभेद्य असलेला गाबाचा किल्ला भारतीय टीमने (India vs Australia) जिंकला. याचसोबत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्येही (Border-Gavaskar Trophy) भारताचा 2-1 ने विजय झाला. ऑस्ट्रेलियाने ठेवलेलं 328 रनचं आव्हान भारताने शेवटच्या दिवशी 7 विकेट गमावून 97व्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. शुभमन गिलचे 91 आणि ऋषभ पंतने नाबाद 89 रनची खेळी केली. तर चेतेश्वर पुजारानेही अर्धशतक केलं. मोहम्मद सिराजने दुसऱ्या इनिंगमध्ये पाच विकेट घेतल्या, तसंच पहिल्या इनिंगमध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूरने अर्धशतकं केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेता आली नाही.

सुंदर आणि ठाकूर यांनी बॅटिंगसोबतच बॉलिंगमध्येही करिश्मा दाखवला. ब्रिस्बेनच्या या टेस्टमध्ये संपूर्ण टीमने उत्कृष्ट कामगिरी केली. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर चाहते राहुल द्रविडला धन्यावद देत आहेत. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री असले, तरी सोशल मीडियावर राहुल द्रविडचं नाव ट्रेण्ड होत आहे.

सोशल मीडियावर राहुल द्रविडला सलाम केला जात आहे, कारण ब्रिस्बेन टेस्टमध्ये खेळलेल्या बहुतेक खेळाडूंनी त्यांच्या यशाचं श्रेय राहुल द्रविडला दिलं आहे. राहुल द्रविड हा भारताच्या ए टीमचा प्रशिक्षकही होता. त्याच्याच मार्गदर्शनाखाली वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, मनिष पांडे, ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी खूप क्रिकेट खेळलं. या खेळाडूंनी अनेकवेळा राहुल द्रविडमुळे आपला खेळण्याचा स्तर सुधारला असल्याचं सांगितलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली द्रविडची टीम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारताची बॉलिंग अनुभवी नव्हती. 2 टेस्ट खेळणारा मोहम्मद सिराज बॉलिंगचं नेतृत्व करत होता. तर शार्दुल ठाकूरने फक्त 1 टेस्ट मॅच खेळली होती. वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांचा हा पदार्पणाचा सामना होता. हे खेळाडू राहुल द्रविडकडून खूप शिकले आहेत. राहुल द्रविडने या खेळाडूंबाबत घेतलेल्या मेहनतीच फळ ब्रिस्बेनमध्ये मिळालं.

जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, उमेश यादव यांच्या अनुपस्थितीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत पराभव केला. सध्या राहुल द्रविड हा एनसीएचा अध्यक्ष आहे. भारतीय टीमची बेंच स्ट्रेन्थ मजबूत करण्याचं संपूर्ण श्रेय राहुल द्रविडलाच जातं.

Published by: Shreyas
First published: January 21, 2021, 9:09 AM IST
Tags:

ताज्या बातम्या