IND vs AUS : अजिंक्यच्या नेतृत्वात भारताचा विजय, विराट म्हणतो...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) 8 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानेही ट्विट करून भारतीय टीमचं अभिनंदन केलं आहे.
मेलबर्न, 29 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) 8 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. याचसोबत भारताने या सीरिजमध्ये 1-1 ची बरोबरीही केली आहे. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा मानहानीकारक पराभव झाला होता. या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा फक्त 36 रनवर ऑल आऊट झाला. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा निचांकी स्कोअर होता. या पराभवानंतर भारताने केलेल्या पुनरागमनाचं सगळीकडूनच कौतुक होतं आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानेही ट्विट करून भारतीय टीमचं अभिनंदन केलं आहे. 'भारतीय टीमने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आणि विजय मिळवला. भारतीय खेळाडू आणि खासकरून अजिंक्य रहाणेसाठी खूप आनंदी आहे. यानंतर आमची कामगिरी अधिक चांगली आणि वरची असेल,' असं ट्विट विराट कोहलीने केलं आहे.
What a win this is, absolutely amazing effort by the whole team. Couldn't be happier for the boys and specially Jinks who led the team to victory amazingly. Onwards and upwards from here
विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय टीमचं नेतृत्व करत आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून भारतात परतला. विराटच्या नेतृत्वात पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला होता. विराटशिवाय मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय टीम मैदानात उतरली होती. शमीला पहिल्या टेस्टदरम्यान दुखापत झाली होती. तर या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये उमेश यादवही दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे तो बॉलिंग टाकू शकला नाही.
अजिंक्य रहाणेचं शतक, रविंद्र जडेजाची ऑल राऊंड कामगिरी आणि सिराज, बुमराह तसंच अश्विनची भेदक बॉलिंग ही टीम इंडियाच्या विजयाची प्रमुख कारणं ठरली. तसंच आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या शुभमन गिल यानेही छाप पाडली. अजिंक्य रहाणेला त्याच्या शतकी खेळीबद्दल मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.