सिडनी, 8 जानेवारी : भारताविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टमध्ये सपशेल अपयशी ठरलेला स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) तिसऱ्या टेस्टमध्ये पुन्हा फॉर्ममध्ये आला. सिडनीमधल्या या टेस्ट मॅचमध्ये स्मिथने शानदार शतकी खेळी केली. स्मिथचं टेस्ट क्रिकेटमधलं हे 27वं शतक होतं. ऑस्ट्रेलियामध्ये त्याने 3 वर्षांनंतर टेस्ट शतक केलं. या कामगिरीसह त्याने अनेक रेकॉर्डही स्वत:च्या नावावर केली.
स्मिथने 201 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं, त्याच्या या खेळीमध्ये 13 फोरचा समावेश होता. 131 रन करून स्मिथ आऊट झाला. स्मिथचं भारताविरुद्धचं हे आठवं शतक होतं. भारताविरुद्ध सर्वाधिक शतकं करण्याच्या रेकॉर्डचीही स्मिथने बरोबरी केली आहे. स्मिथशिवाय गॅरी सोबर्स, व्हिवियन रिचर्ड्स आणि रिकी पॉण्टिंग यांनीही भारताविरुद्ध सर्वाधिक 8 टेस्ट शतकं केली आहेत. स्मिथने मात्र या सगळ्यांपेक्षा कमी इनिंगमध्ये हा रेकॉर्ड केला आहे.
स्मिथचं टेस्ट क्रिकेटमधलं हे 27वं शतक होतं. याचसोबत त्याने टेस्टमध्ये विराट, एलन बॉर्डर आणि ग्रॅम स्मिथ यांच्या रेकॉर्डचीही बरोबरी केली आहे. या तिघांच्या नावावरही टेस्ट क्रिकेटमध्ये 27 शतकं आहेत. सिडनीमध्ये शतक लगावत स्मिथने सोबर्स यांचा 26 शतकांचा विक्रम मोडीत काढला.
स्मिथने ऑस्ट्रेलियामध्ये तीन वर्षांनंतर टेस्टमध्ये शतक केलं. याआधी सप्टेंबर 2017 साली त्याने मेलबर्नमध्ये शतक केलं होतं. त्यावेळी त्याने इंग्लंडविरुद्ध 102 रन केले होते.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरचं स्मिथचं हे लागोपाठ तिसरं आंतरराष्ट्रीय शतक होतं. याआधी भारताविरुद्ध मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याने वनडे सीरिजमध्ये 105 आणि 104 रनची खेळी केली होती.
सगळ्यात कमी इनिंगमध्ये 27 शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. डॉन ब्रॅडमन यांनी सगळ्यात कमी 70 इनिंगमध्ये 27 शतकं केली होती. स्मिथ या यादीत 136 इनिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्मिथनंतर विराट कोहली (141), सचिन तेंडुलकर (141) आणि सुनील गावसकर (154) यांचा नंबर लागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.