सिडनी, 6 जानेवारी : विराट कोहली (Virat Kohli) च्या अनुपस्थितीमध्ये भारतीय टीमचं नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सिडनी टेस्टमध्ये एका खास विक्रमाची बरोबरी करू शकतो. ऍडलेडमधली पहिली टेस्ट गमावल्यानंतर टीम इंडियाने रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्नमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. रहाणेने नेतृत्वाला साजेशी अशी शतकी खेळी केली. आता सिडनी टेस्टमध्ये त्याला भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni)च्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.
भारताला आयसीसीच्या तीन ट्रॉफी मिळवून देणाऱ्या धोनीने 2008 साली अनिल कुंबळेच्या निवृत्तीनंतर टेस्ट मॅचचं नेतृत्व स्वीकारलं होतं. धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे, ज्याने आपल्या नेतृत्वात पहिल्या चारही टेस्टमध्ये विजय मिळवला. रहाणेने कर्णधार म्हणून आतापर्यंत तीन टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवला आहे. रहाणेच्या नेतृत्वात भारताने दोनवेळा ऑस्ट्रेलियाचा आणि एकदा अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. सिडनी टेस्टमध्ये विजय मिळवत रहाणे धोनीच्या या विक्रमाची बरोबरी करू शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध रहाणेचं बॅटिंगचं रेकॉर्डही उत्तम आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (1809), विराट कोहली (1352), व्हीव्हीएस लक्ष्मण (1236) आणि राहुल द्रविड (1143) यांनी ऑस्ट्रेलियात एक हजारापेक्षा जास्त रन केले आहेत. सिडनी टेस्टमध्ये रहाणेने 203 रन केले तर तो या यादीमध्ये पोहोचेल.
अजिंक्य रहाणेचं टेस्ट क्रिकेटमधलं खासकरून परदेशी मैदानांवरचं रेकॉर्डही शानदार आहे. सिडनी टेस्टमध्ये रहाणेने 109 रन केले तर तो भारताबाहेर 3 हजारांपेक्षा जास्त रन करणारा 10वा भारतीय खेळाडू ठरेल. या यादीत सचिन तेंडुलकर, गावसकर, द्रविड, लक्ष्मण यांच्यासारख्या दिग्गजांची नावं आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी टेस्ट मॅच सिडनीमध्ये गुरुवारपासून सुरू होईल. भारताने या मैदानात 12 टेस्ट खेळल्या असून फक्त एकदाच त्यांना विजय मिळवता आला आहे. 42 वर्षांपूर्वी 1978 साली भारतीय टीमने सिडनीच्या मैदानात कांगारूंचा पराभव केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.