सिडनी, 12 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली टेस्ट सीरिज सुरू व्हायला आता फक्त 4 दिवस बाकी आहेत. 17 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाचे ओपनर कोण असणार? याबाबत चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मयंक अगरवाल (Mayank Agarwal) पहिल्या टेस्टमध्ये ओपनिंगला खेळेल, हे निश्चित आहे, पण कर्णधार विराट कोहली मयंकसोबत ओपनिंगला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)ला पाठवणार का शुभमन गिल (Shubhaman Gill) याला संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
यावर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यात रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळला नव्हता. तर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित खेळणार नाही. मागच्यावर्षी भारतात दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या सीरिजमध्ये रोहितने मयंक अगरवालसोबत ओपनिंगला बॅटिंग केली होती. तर मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पृथ्वी शॉला दुखापत झाल्यामुळे अगरवालने पहिले हनुमा विहारी आणि मग केएल राहुलसोबत ओपनिंग केली होती.
पृथ्वी शॉचा खराब फॉर्म
2018 साली टीम इंडियासाठी टेस्टमध्ये पदार्पण करणारा पृथ्वी शॉ सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक झाली. पृथ्वी शॉने 4 इनिंगमध्ये 24.5 च्या सरासरीने फक्त 98 रन केले. यानंतर आयपीएलच्या सुरुवातीच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही त्याला नंतर रन करता आल्या नाहीत, म्हणून दिल्लीच्या टीमने त्याला बाहेरही ठेवलं होतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या सराव सामन्यातही त्याने 0,19,40 आणि 3 रनची खेळी केली.
शुभमन गिलही दावेदार
21 वर्षांच्या शुभमन गिलला आतापर्यंत 3 वनडे मॅच खेळण्याची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनीमध्ये झालेल्या वनडेमध्ये गिल 33 रन करून आऊट झाला. यानंतर सराव सामन्यात त्याने 65 रनची खेळी केली, ज्यामध्ये 10 फोरचा समावेश होता.