सिडनी, 6 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टला गुरूवारी सिडनीमध्ये सुरूवात होत आहे. यानंतर सीरिजची चौथी आणि शेवटची टेस्ट ब्रिस्बेन (Brisbane) मध्ये 15 जानेवारीपासून होणार आहे. पण ब्रिस्बेनमधल्या या टेस्ट मॅचबाबत अजूनही वाद सुरूच आहेत. ब्रिस्बेनमधल्या क्वारंटाईनच्या नियमांमुळे टीम इंडिया चौथी टेस्ट खेळू इच्छित नाही, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तिसऱ्या टेस्टआधी हा वाद मिटला असं वाटत असतानाच बीसीसीआय क्रिकेट ऑस्ट्रेलियाला एक अल्टिमेटम द्यायच्या विचारात आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायच्या आधी टीम इंडिया युएईमध्ये 14 दिवस क्वारंटाईन होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियात पोहोचल्यावरही भारतीय टीमला 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं. आता दौरा संपवण्याआधी टीम इंडियाला पुन्हा क्वारंटाईन व्हायचं नाही, त्यामुळे बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला खेळाडूंना आयसोलेशन नसावं किंवा तिसऱ्या टेस्टनंतरच सीरिज संपवण्याचं सांगितल्याचं वृत्त आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना पुन्हा आयसोलेट व्हावं लागणार नाही, असं आश्वासन दिलं होतं, पण ब्रिस्बेनमधले स्थानिक अधिकारी आणखी एक क्वारंटाईन नियम लागू करत आहेत, याचा बीसीसीआयने स्वीकार केलेला नाही. हा वाद सुरू असतानाच क्वीन्सलॅन्डमधल्या क्रीडा आणि आरोग्यमंत्र्यांनी टीम इंडियाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. इथले नियम पाळायचे नसतील, तर येऊ नका, असं वक्तव्य केल्यामुळे हा वाद वाढला होता.
माध्यमांमधल्या वृत्तानुसार जर ब्रिस्बेनमध्ये क्वारंटाईनचा नियम पाळावा लागला, तर चौथी टेस्ट सिडनीमध्ये आयोजित केली जाऊ शकते, किंवा ही सीरिज तीन टेस्ट मॅचचीच होऊ शकते. जर असं झालं तर भारतीय टीम तिसऱ्या टेस्टनंतरच मायदेशी परतेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.