मेलबर्न, 26 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या सत्रामध्ये भारताने (India vs Australia) शानदार सुरुवात केली. पहिल्याच सत्रात भारताने ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट घेतल्या. यातल्या दोन विकेट रविचंद्रन अश्विन (R. Ashwin) ला तर एक विकेट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ला मिळाली. टीम इंडियाने पहिल्या सत्रात अवलंबलेल्या रणनीतीबद्दल संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) आणि झहीर खान (Zaheer Khan) यांनी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) चं कौतुक केलं आहे. दिवसाचं पहिलं सत्र अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाच्या नावावर होतं, असं संजय मांजरेकर म्हणाले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला शनिवारी सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाने 65 रन करून 3 विकेट गमावल्या होत्या. जो बर्न्स, मॅथ्यू वेड आणि स्टीव्ह स्मिथ पॅव्हेलियनमध्ये परतले होते.
लंच ब्रेकमध्ये माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी भारताच्या या कामगिरीचं श्रेय कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाला दिलं. 'जेव्हा खेळपट्टीमध्ये ओलावा असतो आणि बॉल नवीन असतो, तेव्हा कर्णधार फास्ट बॉलरकडे बॉल देतो, पण रहाणेने अश्विनकडे बॉल दिला. हा मोठा निर्णय होता. ज्याचा भारताने पुरेपूर फायदा करून घेतला. त्यामुळे अजिंक्य रहाणे वेलडन,' अशी प्रतिक्रिया मांजरेकर यांनी दिली.
झहीर खान यानेही आपण मांजरेकर यांच्या मताशी सहमत आहोत, असं सांगितलं. 'रहाणेने ठरलेल्या रणनीतीनुसार नेतृत्व केलं नाही. तो खेळासोबत पुढे गेला आणि त्याने परिस्थिती समजून घेतली. स्पिनरही खेळपट्टीतल्या ओलाव्याचा फायदा उचलू शकतात, हे आपल्याला माहिती आहे. अश्विनने हे करून दाखवलं, त्याने आधीही हे करून दाखवलं होतं. पण अश्विनसोबतच रहाणेच्या नेतृत्वालाही याचं श्रेय द्यावं लागेल, कारण त्याने अश्विनला संधी दिली,' असं झहीर म्हणाला.