Home /News /sport /

IND vs AUS : श्रेयस अय्यरचा 111 मीटर लांब सिक्स, फिल्डिंग कोच श्रीधरही चक्रावले, पाहा VIDEO

IND vs AUS : श्रेयस अय्यरचा 111 मीटर लांब सिक्स, फिल्डिंग कोच श्रीधरही चक्रावले, पाहा VIDEO

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या टी-20 मध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने 111 मीटर लांब सिक्स मारला. हा उत्तुंग सिक्स पाहून विराट कोहली (Virat Kohli) देखील बघतच बसला.

    सिडनी, 6 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा 6 विकेटने दणदणीत विजय झाला. याचसोबत भारताने ही टी-20 सीरिज एक मॅच राखून जिंकत वनडे सीरिजच्या पराभवाचा बदला घेतला. तीन मॅचच्या सीरिजमध्ये भारताने 2-0ने आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयाचे हिरो ठरले हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan). या दोघांनी विजय खेचून आणला असला तरी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यानेही मोक्याच्या क्षणी उत्तुंग सिक्स मारला. श्रेयस अय्यरने मारलेला हा सिक्स तब्बल 111 मीटर लांब गेला. अय्यरचा हा शॉट कर्णधार विराट कोहलीदेखील बघत बसला. अय्यरचा सिक्स पाहून ड्रेसिंग रूममध्ये असलेला विराट, केएल राहुल, फिल्डिंग कोच आर. श्रीधरही चक्रावले. श्रेयसचा हा शॉट पाहून टीम इंडियाच्या इतर सहकाऱ्यांनी जल्लोष केला. 17 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला श्रेयस अय्यरने एडम झम्पाला हा 111 मीटरचा सिक्स मारला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये अपयशी ठरलेल्या श्रेयस अय्यरला पहिल्या टी-20 मॅचमध्ये संधी मिळाली नव्हती. पण मनिष पांडेच्या कोपराला दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या टी-20 मध्ये श्रेयस अय्यरला संधी मिळाली, अय्यरनेही या संधीचं सोनं केलं. त्याने 5 बॉलमध्ये 1 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 12 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये अय्यरने 2, 38 आणि 19 रन केले होते. वनडे सीरिजमध्ये अय्यरला एकही सिक्स मारता आला नव्हता. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 195 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनने 36 बॉलमध्ये 52 रनची आक्रमक खेळी केली. तर हार्दिक पांड्याने शेवटच्या काही ओव्हरमध्ये तुफान फटकेबाजी केली. पांड्याने 22 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 42 रनची खेळी केली, त्याचा स्ट्राईक रेटही 190.90 एवढा होता. याआधी शुक्रवारी भारताने कॅनबेरामध्ये झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये 11 रनने विजय मिळवला होता. भारताने 18 व्या ओव्हरमध्ये 12 रन केले, यानंतर शेवटच्या दोन ओव्हरमध्ये त्यांना विजयासाठी 25 रनची गरज होती. पांड्याने 19 व्या ओव्हरमध्ये दोन फोर मारले, त्यामुळे शेवटच्या ओव्हरला विजयसाठी 14 रन हव्या होत्या. यानंतर पांड्याने दोन रन आणि दोन सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या