मुंबई, 15 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजला 17 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. ऍडलेडमध्ये होणारी ही पहिली टेस्ट डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवण्यात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली ही बहुप्रतिक्षित सीरिज सुरू होण्याआधी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने त्याचं मत मांडलं आहे. ऑस्ट्रेलियाची टीम मजबूत असल्याचं सचिन म्हणाला आहे. डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यांच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाची टीम आणखी धोकादायक झाली आहे. या दोन्ही खेळाडूंवर बॉलशी छेडछाड केल्यामुळे वर्षभराची बंदी घालण्यात आली होती.
सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाचा आणखी एक खेळाडू मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) देखील भारतासाठी डोकेदुखी ठरेल, असं वाटत आहे. 'मागच्यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध खेळली होती, तेव्हा वॉर्नर, स्मिथ आणि लाबुशेन हे तीन महत्त्वाचे खेळाडू नव्हते. ऑस्ट्रेलियाची यंदाची टीम मागच्यावेळपेक्षा जास्त मजबूत आहे. जेव्हा तुमच्या टीममध्ये वरिष्ठ खेळाडू नसतात, तेव्हा पोकळी निर्माण होते,' असं सचिन म्हणाला.
2018-19 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचा टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने विजय झाला होता. त्यावेळी स्मिथ-वॉर्नर यांच्यावर बंदी होती, तर मार्नस लाबुशेनने पदार्पणही केलं नव्हतं. सचिनच्या मते जसप्रीत बुमराह आणि अश्विनच्या नेतृत्वात भारताची बॉलिंग ताकदवान आहे आणि ऑस्ट्रेलियाला आव्हान देऊ शकते.
'प्रत्येक युगाला वेगळं ठेवलं पाहिजे, मला तुलना आवडत नाही, पण भारताकडे आता संपूर्ण बॉलिंग आक्रमण आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या खेळपट्टीवर खेळता, हे फार महत्त्वाचं नाही. आपल्याकडे स्विंग बॉलर, लेग स्पिनर आणि ऑफ स्पिनर आहेत,' अशी प्रतिक्रिया सचिनने दिली.