मुंबई, 15 डिसेंबर : टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) मंगळवारी ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. सूत्रांनी एएनआयला दिलेल्या वृत्तानुसार रोहित दुबईच्या मार्गाने ऑस्ट्रेलियाला पोहोचेल. तिकडे पोहोचल्यानंतर रोहित क्वारंटाईन कालावधीमध्ये आपल्या फिटनेसवर काम करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टेस्ट सीरिजला 17 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियात गेल्यावर रोहितला 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे, त्यामुळे तो तिसऱ्या टेस्टपासून उपलब्ध असेल.
युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या 13 व्या मोसमात रोहित शर्माला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नव्हती. यानंतर रोहित एनसीएमध्ये दुखापतीवर उपचार घेण्यासाठी आणि फिट होण्यासाठी गेला. एनसीएने रोहितला फिट घोषित केल्यानंतर तो ऑस्ट्रेलियासाठी निघाला. आयपीएल संपल्यानंतर रोहित दुबईवरून ऑस्ट्रेलियाला गेला नाही, तर तो कौटुंबिक कारणांमुळे भारतात आला, यानंतर तो बंगळुरूला एनसीएमध्ये गेला.
फिटनेसवर काम करणार
एनसीएच्या फिजियोने शुक्रवारी रोहितला फिट घोषित केलं. यानंतर शनिवारी बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा केली. तसंच रोहित ऑस्ट्रेलियात क्वारंटाईन कालावधीमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करेल. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर रोहितची पुन्हा एकदा फिटनेस टेस्ट होईल आणि यानंतरच त्याच्या खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं.