सिडनी, 28 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या वनडेमध्ये रनचा पाऊस पडला. या मॅचमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला असला तरी दोन्ही टीमने 300 पेक्षा जास्त रन केले. या मॅचमध्ये खेळाडूंनी दोन शतकं आणि तीन अर्धशतकं केली. मॅचमध्ये मोठ्या प्रमाणावर फोर आणि सिक्सही मारण्यात आले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या या मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड तुटता तुटता राहिली. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी सुरुवातीच्या विकेट गमावल्यानंतरही भारताच्या आशा कायम ठेवल्या.
ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक रन
या मॅचमध्ये दोन्ही टीमनी मिळून 682 रन केले. ऑस्ट्रेलियातला वनडे क्रिकेटमधला हा दुसरा सगळ्यात मोठा स्कोअर होता. 2015 साली ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या मॅचमध्ये 688 रन झाल्या होत्या.
शतकं आणि अर्धशतकं
या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून दोन खेळाडूंनी शतकं केली. कर्णधार एरॉन फिंच याने 124 बॉलमध्ये 114 रन केले, तर यानंतर स्मिथने 66 बॉलमध्ये 105 रनची खेळी केली. 62 बॉलमध्ये शतक करणारा स्मिथ ऑस्ट्रेलियाकडून सगळ्यात जलद शतक करणारा तिसरा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाकडून सगळ्यात जलद शतक करण्याचा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे. मॅक्सवेलने 2015 साली श्रीलंकेविरुद्ध 51 बॉलमध्येच शतक केलं होतं. भारताकडून या मॅचमध्ये हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांनीही अर्धशतकी खेळी केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.