IND vs AUS : विजयानंतर जडेजा म्हणाला, धोनीचा तो सल्ला नेहमी लक्षात ठेवतो!

IND vs AUS : विजयानंतर जडेजा म्हणाला, धोनीचा तो सल्ला नेहमी लक्षात ठेवतो!

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या पार्टनरशीपमुळे भारताने तिसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलिया (India vs Australia) चा पराभव केला. मॅचनंतर जडेजाने एमएस धोनी (MS Dhoni)च्या सल्ल्याचीही आठवण काढली.

  • Share this:

कॅनबेरा, 3 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली तिसरी वनडे मॅच कॅनबेरामध्ये खेळवण्यात आली. या मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 13 रनने पराभव केला. पण पहिल्या दोन वनडेमध्ये पराभव झाल्यामुळे भारताला सीरिज गमवावी लागली. शेवटच्या वनडेमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या पार्टनरशीपमुळे भारताने व्हाईट वॉशची नामुष्की टाळली. या मॅचमध्ये रविंद्र जडेजाने पुन्हा एकदा ऑलराऊंड कामगिरी केली. मॅचनंतर जडेजाने एमएस धोनी (MS Dhoni)च्या सल्ल्याचीही आठवण काढली.

सोनी स्पोर्ट्सशी रविंद्र जडेजा बोलत होता. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने जडेजाला प्रश्न विचारला. 'भारतीय बॅट्समननी धोनीचा दृष्टीकोन वापरला असता, तर फायदा झाला असता का?' असा प्रश्न सेहवागने विचारला. त्यावर उत्तर देताना जडेजा म्हणाला, 'अगदी बरोबर. माही बराच काळ टीम इंडिया आणि चेन्नई सुपरकिंग्जसाठी खेळला. त्याने काही गोष्टी ठरवल्या होत्या. जो बॅट्समन खेळत असेल, त्याने मोठी पार्टनरशीप करावी. सेट झाल्यानंतर मोठे शॉट मारण्याचे प्रयत्न करावेत.'

'मॅच लांबवता येईल तेवढी लांबवा, शेवटपर्यंत मॅच न्या, असं धोनी नेहमी सांगतो. अशा परिस्थितीमध्ये मी नेहमी त्याचा सल्ला लक्षात ठेवतो. शेवटच्या चार-पाच ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न मी करतो,' असं वक्तव्य जडेजानं केलं.

जडेजा आणि पांड्या यांनी तिसऱ्या वनडेमध्ये सहाव्या विकेटसाठीची टीम इंडियाची सगळ्यात मोठी पार्टनरशीप केली. हे करत असताना त्यांनी 21 वर्ष जुनं रेकॉर्ड मोडलं. या मॅचमध्ये पांड्याने 76 बॉलमध्ये 92 रन आणि जडेजाने 50 बॉलमध्ये 66 रनची खेळी केली. 'आजची परिस्थितीही तशीच होती. मी आणि हार्दिक बोलत होतो. शेवटच्या पाच ओव्हरमध्ये आम्ही मोठे शॉट्स खेळण्याचं ठरवलं आणि आमची योजना यशस्वी ठरली,' अशी प्रतिक्रिया जडेजाने दिली.

Published by: Shreyas
First published: December 3, 2020, 6:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या