IND vs AUS : रविंद्र जडेजावर यशस्वी शस्त्रक्रिया, रुग्णालयातून फोटो शेयर करत म्हणाला...
भारताचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) वर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयातूनच रविंद्र जडेजाने एक फोटो शेयर करत लवकरच धमाकेदार पुनरागमन करू असं सांगितलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सुरू असलेल्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजच्या तिसऱ्या मॅचमध्ये रविंद्र जडेजाला दुखापत झाली.
सिडनी, 13 जानेवारी : भारताचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) वर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयातूनच रविंद्र जडेजाने एक फोटो शेयर करत लवकरच धमाकेदार पुनरागमन करू असं सांगितलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सुरू असलेल्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजच्या तिसऱ्या मॅचमध्ये रविंद्र जडेजाला दुखापत झाली. तिसऱ्या दिवशी बॅटिंग करत असताना जडेजाच्या हाताला बॉल लागला. स्कॅनिंग केल्यानंतर त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असल्याचं निष्पन्न झालं.
दुखापतीमुळे रविंद्र जडेजा आधीच चौथ्या टेस्टमधून बाहेर झाला आहे. तिसरी टेस्ट संपल्यानंतर पुढच्याच दिवशी जडेजाच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर जडेजाने एक फोटो शेयर केला आहे. काही काळ मैदानातून बाहेर असेन, शस्त्रक्रिया करण्यात आली, पण लवकरच धमाकेदार पुनरागमन करीन, असं जडेजा या पोस्टमध्ये म्हणाला आहे.
शस्त्रक्रियेनंतर जडेजा रिहॅबिलिटेशनसाठी एनसीएमध्ये जाईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जडेजाने शानदार कामगिरी केली होती. सिडनी टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने चार विकेट घेतल्या होत्या, सोबतच स्टीव्ह स्मिथला डायरेक्ट हिट करून रन आऊट केलं होतं. मेलबर्नमध्ये झालेल्या भारताच्या विजयातही जडेजाने मोलाची भूमिका बजावली होती.
टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण
मोहम्मद शमी, उमेश यादव, रविंद्र जडेजा, हनुमा विहारी, केएल राहुल हे या दौऱ्यातून आधीच बाहेर झाले आहेत. जसप्रीत बुमराहच्या पोटाची दुखापत गंभीर असल्यामुळे तोदेखील ब्रिस्बेनची टेस्ट खेळण्याची शक्यता कमी आहे. तर सिडनी टेस्टमध्ये ऋषभ पंतच्या कोपराला दुखापत झाली आणि आर.अश्विन पाठीची दुखापत घेऊन खेळत होता. नेटमध्ये सराव करत असताना मयंक अगरवाल यालाही दुखापत झाली आहे. इशांत शर्माला आयपीएल सुरू झाल्यावरच दुखापत झाल्यामुळे तो या दौऱ्यावर येऊ शकला नाही.