मेलबर्न, 26 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टसाठी शुक्रवारी टीम इंडियाची (India vs Australia) घोषणा झाली. यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना पुन्हा ट्रोल करण्यात आलं. दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीममध्ये चार बदल करण्यात आले. शुभमन गिल, ऋषभ पंत, ऋद्धीमान साहा आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली. पण शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या केएल राहुल (KL Rahul) याला टीममध्ये संधी मिळाली नाही, त्यामुळे केएल राहुलचे चाहते नाराज झाले आणि त्यांनी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रोल करायला सुरूवात केली.
जोपर्यंत रवी शास्त्री भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक आहेत, तोपर्यंत केएल राहुल आणि रोहित शर्मा यांची कारकीर्द सेट होणार नाही, असे आरोप ट्रोलर्सनी केले. तसंच अनेकांनी केएल राहुलऐवजी हनुमा विहारीला संधी देण्याबाबतही आक्षेप घेतले.
केएल राहुल फॉर्ममध्ये
विराट कोहलीच्या गैरहजेरीत केएल राहुल याला संधी मिळेल, असं बोललं जात होतं, पण राहुलला संधी मिळाली नाही. केएल राहुल न्यूझीलंड दौऱ्यापासून फॉर्ममध्ये आहे. वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये केएल राहुलने खोऱ्याने रन काढले आहेत. केएल राहुल सध्या आत्मविश्वासात आहे आणि त्याच्याकडे ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभवही आहे, पण टीमने शुभमन गिल आणि हनुमा विहारी यांच्यासारख्या कमी अनुभव असणाऱ्यांना संधी दिली.
भारतीय टीम
मयंक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आर.अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव