मेलबर्न, 30 डिसेंबर : अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)च्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला, याचसोबत 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-1 ची बरोबरी केली आहे. आता 7 जानेवारीपासून तिसऱ्या टेस्टला सुरूवात होणार आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय बॉलरनी शानदार कामगिरी केली होती. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आर अश्विन यांच्या भेदक बॉलिंगपुढे ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 195 रन रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 200 रन केले.
तिसऱ्या टेस्टमध्येही जबाबदारी बॉलरवरच असेल, असं टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले आहेत. आम्ही तिसऱ्या टेस्टमध्येही 5 बॉलर घेऊन मैदानात उतरू. रोहित शर्मा बुधवारी टीमसोबत येईल. तो किती फिट आहे, ते पाहावं लागेल. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर त्याला कसं वाटत आहे, ते पाहूनच निर्णय घेतला जाईल, असं शास्त्रींनी स्पष्ट केलं.
3 फास्ट बॉलर आणि 2 स्पिनर
मेलबर्न टेस्टमध्ये भारतीय टीम 3 फास्ट बॉलर आणि 2 स्पिनर घेऊन मैदानात उतरली होती. उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी फास्ट बॉलिंगची तर अश्विन आणि जडेजाने स्पिनची जबाबदारी सांभाळली. पण दुसऱ्या इनिंगमध्ये उमेश यादवला दुखापत झाली.
उमेश यादवने दुसऱ्या इनिंगमध्ये जो बर्न्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्याने फक्त 3.3 ओव्हर बॉलिंग केली, पण पोटरीला दुखापत झाल्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. उमेशची दुखापत बघता त्याला लगेच रुग्णालयात स्कॅनिंगसाठी नेण्यात आलं. तिसऱ्या टेस्टमध्ये त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.