IND vs AUS : विराटसेनेनं काढला पराभवाचा वचपा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 36 धावांनी मिळवला विजय

IND vs AUS : विराटसेनेनं काढला पराभवाचा वचपा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 36 धावांनी मिळवला विजय

दुसऱ्या सामन्यात भारतानं 36 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1ने बरोबरी केली आहे.

  • Share this:

राजकोट, 17 जानेवारी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियानं दमदार कमबॅक केला. दुसऱ्या सामन्यात भारतानं 36 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1ने बरोबरी केली आहे. भारतानं दिलेल्या 341 धावांचे बलाढ्य आव्हान पार करने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जमले नाही. तर, मोहम्मद शमीनं 3, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथनं 98 धावांची खेळी करत भारताचा डाव सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णयाक तिसरा सामना आता 19 जानेवारीला बंगळुरू येथे होणार आहे. याआधी पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं 10 विकेटनं भारताचा पराभव केला. तर, दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार कमबॅक केला.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन (96), विराट कोहली (78) आणि केएल राहुल (80) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतानं 340 धावा केल्या. मात्र भारतानं दिलेले हे आव्हान पार करने ऑस्ट्रेलियाला जमले नाही.

राजकोटमध्ये पहिल्यांदाच भारतानं जिंकला सामना

आजपर्यंत भारतानं राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट संघ स्टेडियमवर एकही सामना जिंकलेला नव्हता. त्यामुळं ऑस्ट्रेलियाल दुसऱ्या सामन्यात पराभूत करत भारतानं या मैदानातही विजयी सुरुवात केली. याआधी या मैदानात खेळलेल्या दोन्ही सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला होता. 11 जानेवारी 2015 रोजी इंग्लंडविरुद्ध एससीए स्टेडियमवर भारताने पहिला एकदिवसीय सामना खेळला होता, त्यात भारताला 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 18 ऑक्टोबर 2015 रोजी टीम इंडियाला याच मैदानावर 18 धावांनी पराभव पत्करावा लागला.

भारतीय क्रिकेटपटूंवर दुखापतींचे सावट

भारतीय संघात सध्या चिंतेचा विषय आहे तो खेळाडूंचा फिटनेस. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पॅट कमिन्सचा चेंडू डोक्याला लागून ऋषभ पंत जखमी झाला होता. त्यानंतर आता भारताचा आणखी एक खेळाडू जखमी झाला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन दुसऱ्या सामन्यात पॅट कमिन्सच्याच बाउन्सरवर जखमी झाला. त्यामुळं शिखर धवन दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. तर, क्षेत्ररक्षण करत असताना रोहित शर्मा जखमी झाला. त्यामुळं तिसऱ्या आणि निर्णयाक सामन्यात भारताचे टॉप फलंदाज जखमी असतील तर भारतासाठी चिंतेची बाब असेल.

भारतीय संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), अ‍ॅलेक्स केरी (यष्टिरक्षक), पॅट्रिक कमिन्स, अ‍ॅश्टॉन अगर, पीटर हँड्सकोम्ब, जोश हॅझलवूड, मार्नस लबूशेन, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टॉन टर्नर, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2020 01:04 PM IST

ताज्या बातम्या