सिडनी, 8 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला 17 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यामध्ये सराव सामना सुरू आहे. पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा युवा बॅट्समन विल पुकोवस्की (Will Pucovski) याच्याकडून ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपल आणि मायकल क्लार्क यांना खूप अपेक्षा आहेत. 22 वर्षांचा हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तयार असल्याचं मत त्यांनी मांडलं होतं. पण भारताविरुद्धच्या सराव सामन्यात पुकोवस्कीच्या हेल्मेटला बॉल लागला. यानंतर तो मैदानाबाहेर गेला. आता 11 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यातही तो खेळणार नाही.
भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्येही पुकोवस्की खेळण्याची शक्यता कमी आहे. भारताचा फास्ट बॉलर कार्तिक त्यागीने टाकलेला बाऊन्सर पुकोवस्कीच्या हेल्मेटला लागला. यानंतर काही काळ पुकोवस्की मैदानातच बसून राहिला. हेल्मेटला बॉल लागल्यानंतर मेडिकल टीम लगेचच मैदानात आली. पुकोवस्कीमध्ये कनकशनची हलकी लक्षणं आहेत, पण तो कोणाच्याही मदतीशिवाय मैदानाबाहेर गेला, असं टीमचे डॉक्टर जॉन ओर्चर्ड यांनी सांगितलं.
क्रिकेट.एयू.कॉमवर मेडिकल टीमने दिलेल्या माहितीनुसार, 'पुकोवस्कीची देखरेख मेडिकल रूममध्ये केली गेली. तो कर्मचारी, टीम आणि त्याच्या कुटुंबासोबत व्यवस्थित बोलत होता. पुकोवस्की ऑस्ट्रेलियाच्या टीमसोबत राहिल. पण दुसरा सराव सामना खेळणार नाही.'
Fingers crossed for Will Pucovksi, who's retired hurt after this nasty blow to the helmet.
Live scores from #AUSAvIND: https://t.co/MfBZAvzAkr pic.twitter.com/pzEBTfipF2
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2020
पुकोवस्की बॉल लागल्यानंतर लगेचच गुडघ्यावर बसला आणि त्याने बॅट सोडून दिली. डेव्हिड वॉर्नरच्या दुखापतीबाबत साशंकता असल्यामुळे पुकोवस्की पहिल्या टेस्टमध्ये जो बर्न्ससोबत सलामीला बॅटिंगला येईल असं सांगितलं जात होतं, पण आता त्याच्याही खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
मॅच ड्रॉ
भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान साहा याने अर्धशतक केलं, पण बाकीचे बॅट्समन अपयशी ठरले. भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यातला सराव सामना ड्रॉ झाला. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मार्क स्टीकेटी याने 37 रन देऊन 5 विकेट घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झालेला साहाने 100 बॉल खेळून 54 रनची खेळी केली, यामध्ये सात फोरचा समावेश होता.
भारत पहिल्या इनिंगमध्ये 59 रननी पिछाडीवर पडल्यानंतर दुसरी इनिंग 189-9 वर घोषित करण्यात आली. यानंतर ऑस्ट्रेलिया एला 15 ओव्हरमध्ये विजयासाठी 130 रनची गरज होती. तिसऱ्या आणि अखेरच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया ए ने एक विकेट गमावून 52 रन केले होते. अजिंक्य रहाणेने पहिल्या इनिंगमध्ये शतक तर चेतेश्वर पुजाराने अर्धशतक केलं होतं.