नवी दिल्ली, 19 जानेवारी : गावसकर-बॉर्डर ट्रॉफीच्या (Gavaskar-Border Trophy) कसोटी क्रिकेट मालिकेतला शेवटचा सामना जिंकून भारताने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. कारण गॅबा मैदानावर (Gabba Stadium) गेल्या 31 वर्षांत यजमान ऑस्ट्रेलिया संघाला कोणीही हरवू शकलेलं नाही. ही कामगिरी भारताने आज (19 जानेवारी) केली, त्यात भारताचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा सिंहाचा वाटा आहे. शेवटच्या डावात 138 चेंडूंमध्ये 89 धावा करून तो नाबाद राहिला आणि त्याने भारताला ऑस्ट्रेलियावर तीन गड्यांनी विजय मिळवून दिला. या कामगिरीनंतर पंतने भावुक प्रतिक्रिया दिली आहे.
'माझ्या आयुष्यातल्या सर्वांत मोठ्या, महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आजचा दिवस आहे. माझा खेळ चांगला होत नव्हता, तेव्हाही माझ्या टीमने मला दिलेला पाठिंबा ही खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळे आता स्वप्न सत्यात उतरलं आहे. पहिल्या कसोटीनंतर आम्ही खूप कसून सराव करत होतो. टीम मॅनेजमेंटकडून मला कायमच पाठिंबा, सहकार्य मिळतं. 'तू मॅचविनर आहेस. तू खेळलं पाहिजेस,' असं मला त्यांच्याकडून कायम सांगितलं जातं. आज मी ते करू शकलो, याचा मला आनंद आहे,' अशी भावना ऋषभ पंतने व्यक्त केली.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी झालेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला शेवटचा सामना ब्रिस्बेन (Brisbane) शहरात गॅबा स्टेडियमवर होता. त्या सामन्याचा आज (19 जानेवारी) पाचवा दिवस होता. टीमच्या उत्तम कामगिरीमुळे हा सामना भारताने जिंकला आणि मालिका 2-1 अशी खिशात घातली. या संपूर्ण मालिकेत अनेक अडथळ्यांना भारतीय टीम सामोरी गेली. संघाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या सामन्यानंतर पॅटर्निटी लीव्हवर होता. त्याशिवाय अनेक खेळाडू दुखापतींनी ग्रस्त होते. त्यामुळे भारताला दुसरी फळी मैदानात उतरवावी लागली. तरीही शेवटच्या सामन्यात विजयासाठी असलेलं 328 धावांचं आव्हान भारतीय संघाने पेललं आणि गॅबा स्टेडियमवर यजमानांना धूळ चारण्याचा विक्रम केला.
पाचव्या दिवसाच्या खेळाची सुरुवात झाली, तेव्हा 324हून अधिक धावांचं उद्दिष्ट भारतापुढे होतं. तसंच भरपूर पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला होता. रोहित शर्माची (Rohit Sharma) विकेट दिवसाच्या सुरुवातीलाच पडली. त्यामुळे सामना अनिर्णित राहण्याच्या दृष्टीने खेळी करणं हा भारताच्या दृष्टीने सोपा पर्याय होता; पण भारतीय संघाने विजयाचं लक्ष्य ठेवलं आणि शैलीदार खेळ करून ते साध्यही केलं.
Published by:Akshay Shitole
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.