मुंबई, 21 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) वर आपलं नाव कोरलं. सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत धूळ चारण्याचा भीष्मपराक्रम भारतीय टीमने केला. ऑस्ट्रेलिया दौरा संपवून भारतात येणाऱ्या टीम इंडियाला क्वारंटाईन व्हावं लागणार का? यावरून गोंधळ निर्माण झाला होता. पण भारतीय खेळाडूंना क्वारंटाईनमधून स्पेशल सूट दिली जाणार असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
ऑस्ट्रेलियातून मुंबईमध्ये येणाऱ्या क्रिकेटपटूंना 14 दिवसांच्या क्वारंटाईन नियमांमधून सूट देण्यात आली आहे. परदेशातून प्रवास करणाऱ्या खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तरी त्यांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये 7 दिवसांचा संस्थात्मक (हॉटेल किंवा संस्था) क्वारंटाईन आणि पुढचे 7 दिवस घरामध्ये राहावं लागतं, पण टीम इंडियाच्या खेळाडूंना सवलत देण्यात येणार आहे. गुरूवारी सकाळी भारतीय टीमचे खेळाडू दुबईमार्गे भारतात येणार आहेत.
शेवटच्या तीन टेस्टमध्ये भारताचं नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) मुंबईमध्ये परतणार आहेत. भारतीय क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियातून भारतात परतणार आहेत. प्रवासादरम्यान त्यांचं विमान दुबईला गेलं, त्यामुळे त्यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये क्वारंटाईनमधून सूट देण्यात येईल, असं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं.
भारतात युरोप, दक्षिण आफ्रिका आणि मध्य-पूर्वेतल्या देशांमधून आलेल्या नागरिकांसाठी कठोर नियम करण्यात आले आहेत, कारण तिकडे कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. भारतीय खेळाडूही मध्य-पूर्व देशांमधल्याच दुबईमार्गे मुंबईमध्ये परतणार आहेत, त्यामुळे भारतीय खेळाडूंनाही 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये जावं लागणार का? हा प्रश्न उपस्थित झाला होता.
भारतीय खेळाडूंना जर मुंबईमध्ये 14 दिवसाच्या क्वारंटाईनमध्ये जावं लागलं असतं, तर त्यांची इंग्लंडविरुद्धची सीरिज अडचणीत आली असती. या परिस्थितीमध्ये ज्या दिवशी टेस्ट सीरिज सुरू होणार त्याच दिवशी म्हणजे, 5 फेब्रुवारीला खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी संपला असता, आणि त्यांना पहिल्या टेस्टमध्ये सहभागी होता आलं नसतं. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी भारतीय टीम 27 जानेवारीला बायो-बबलमध्ये जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.