सिडनी, 1 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया (India vs Australia) ची खराब कामगिरी सुरूच आहे. सुरुवातीच्या दोन्ही वनडेमध्ये पराभव झाल्यामुळे टीम इंडियाने सीरिज गमावली आहे. दुसऱ्या वनडेवेळी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर (David Warner) याला दुखापत झाली आहे. फिल्डिंग करत असताना बॉल थांबवायला गेलेल्या वॉर्नरला दुखापत झाली, त्यामुळे आता तो वनडे आणि टी-20 सीरिजला मुकणार आहे. वॉर्नरऐवजी डार्सी शॉर्ट याला ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये संधी देण्यात आली आहे.
वॉर्नरच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला धक्का लागला आहे, कारण पहिल्या दोन्ही मॅचमध्ये वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली होती. वॉर्नरच्या दुखापतीनंतर टीम इंडियाचा खेळाडू केएल राहुल (KL Rahul) याने प्रतिक्रिया दिली. वॉर्नर जास्त काळ बाहेर राहिला, तर टीम इंडियासाठी चांगलंच असेल, असं राहुल म्हणाला. पण राहुलचं हे वक्तव्य अनेकांना पटलं नाही. सोशल मीडियावर काहींनी राहुलवर टीका केली.
'वॉर्नर किती काळ बाहेर राहिल, हे आम्हाला माहिती नाही. असं कोणाच्याच बरोबर व्हायला नको, पण जर तो जास्त काळ टीमबाहेर राहिला तर आमच्या टीमसाठी ते चांगलं असेल,' असं राहुल म्हणाला होता. राहुलच्या या विधानावर काँग्रेस कमिटीचे सदस्य अहराज मुल्ला यांनी आक्षेप घेतला. खेळ भावना कुठे आहे? वॉर्नरला दुखापत झाली, तरच टीम इंडिया जिंकणार का? असा प्रश्न अहराज मुल्ला यांनी उपस्थित केला.
केएल राहुल याच्या या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेपही घेतले आहेत. राहुलने एखाद्या आंतरराष्ट्रीय खेळाडूबाबत असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. मी भारतीय आहे, पण तरीही वॉर्नर खेळावा आणि आपण त्यांना हरवावं, अशी माझी इच्छा आहे, असं वक्तव्य एका युजरने केलं.
सिडनीमध्ये झालेल्या पहिल्या दोन्ही वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचे ओपनर डेव्हिड वॉर्नर आणि एरॉन फिंच यांनी भारतीय बॉलरची धुलाई केली. पहिल्या मॅचमध्ये वॉर्नर-फिंच यांच्यात 156 रनची तर दुसऱ्या मॅचमध्ये या जोडीने 142 रनची पार्टनरशीप झाली. ओपनरनी दिलेल्या चांगल्या सुरुवातीमुळेच पहिल्या दोन्ही मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.