ब्रिस्बेन, 13 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि अखेरची टेस्ट मॅच खेळण्यासाठी भारतीय टीम (India vs Australia) ब्रिस्बेनला पोहोचली आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) च्या नेतृत्वात खेळणारी भारतीय टीम सीरिज जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. ही सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. भारतीय टीमला तिसरी टेस्ट ड्रॉ करण्यात यश आलं होतं. यानंतर मंगळवारी दुपारी भारतीय टीम ब्रिस्बेनमध्ये पोहोचली. गाबाच्या जवळ 4 किमी अंतरावर एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये टीम राहिली आहे, पण माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार खेळाडूंना मूलभूत सुविधाही मिळत नाहीयेत.
टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार टीम इंडियासोबत प्रवास करणाऱ्या एका सदस्याने सांगितलं, 'आम्ही हॉटेल रूममध्ये कैद आहोत. आम्हाला स्वत:लाच आमचा बेड आवरावा लागतो, स्वत:लाच टॉयलेट साफ करावं लागत आहे. फ्लोरवरून इकडून तिकडेही आम्हाला जाता येत नाही. संपूर्ण हॉटेल रिकामं आहे, पण आम्हाला स्विमिंग पूल आणि जिमचा वापर करता येत नाही. हॉटेलचे सगळे कॅफे आणि रेस्टॉरंट बंद आहेत.'
'सुविधांबाबत केलेल्या आश्वासनांचं काय झालं? इकडे मिळत असलेल्या सुविधा आणि मिळालेली आश्वासनं यांच्यामध्ये फरक आहे. दौऱ्याआधी बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. एकदा अनिवार्य क्वारंटाईन पूर्ण झाला तर खेळाडूंना गोष्टी सोप्या होतील, असं सांगितलं गेलं होतं. खेळाडूंना गरजेच्या गोष्टी दिल्या जातील, असं बोललं गेलं होतं, पण आता आम्हाला बेड लावण्यापासून ते टॉयेलट साफ करण्याची कामं करावी लागत आहेत. जेव्हा ऑस्ट्रेलियाची टीम भारतात येते तेव्हा बीसीसीआय अशीच वागणूक त्यांना देते का?' असा प्रश्न सूत्राने उपस्थित केला.