ब्रिस्बेन, 17 जानेवारी : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांनी ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याला खुलं पत्र लिहिलं आहे. पेनने आपल्या चुकांमधून शिकावं, असं चॅपल या पत्रात म्हणाले आहेत. शिव्या देणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे, असंही चॅपल त्यांच्या पत्रात म्हणाले. सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तपत्रात चॅपल यांनी हे पत्र लिहीलं. कोणत्याही कामाच्या ठिकाणी शिव्या स्वीकार केल्या जात नाहीत. माझ्या मते शिव्या देणं चुक आहे. असं वागणं तुमची ताकद नाही, तर कमजोरी दाखवते, असं मत चॅपल यांनी मांडलं आहे.
'तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंग करून प्रभाव टाका आणि लाखो मुलांसाठी एक चांगलं उदाहरण समोर ठेवा. मुलांनी त्यांच्या हिरोची सगळ्यात वाईट गोष्ट आत्मसात करू नये. हीच मोठी विरासत आहे, जी तुम्ही देऊ शकता,' असं चॅपल म्हणाले आहेत.
'तीन वर्षांपूर्वी केप टाऊनमध्ये झालेल्या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटची प्रतिमा खराब झाली. ही प्रतिमा सुधारण्यासाठी तू कर्णधार झालास आणि योगदान दिलंस. त्यामुळे आहे तसाच राहा,' असा सल्लाही चॅपल यांनी पेनला दिला.
भारताविरुद्धच्या सिडनी टेस्टमध्ये (India vs Australia) टीम पेननं खूप जास्त प्रमाणात भारतीय खेळाडूंचं स्लेजिंग केलं. तसंच तो बॅटिंग आणि विकेट कीपिंगमध्येही अपयशी ठरला, त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली. या टेस्टमध्ये टीम पेनने आर.अश्विनचं स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला, पण अश्विननेही त्याला प्रत्युत्तर दिलं. स्लेजिंग करण्याच्या नादात पेनचं लक्ष विचलीत झालं आणि त्याने कॅचही सोडले. मॅच संपल्यानंतर पेनने झालेल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली.