ब्रिस्बेन, 19 जानेवारी : भारतीय संघाने (India) ऑस्ट्रेलियाच्या (australia) संघाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत करून नवा इतिहास रचला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने रोमांचक सामन्यात दणदणीत विजय मिळवून मालिका खिश्यात घातली आहे. पाच दिवस चाललेल्या संघर्षाचा आज शेवट गोड करत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा धूळ चारली आहे.
ऋषभ पंतची तुफान खेळी
दुसऱ्या इनिंगमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) यांची आक्रमक खेळी आणि चेतेश्वर पुजाराचं संयमी अर्धशतक भारताच्या विजयात मोलाचं ठरलं. ऋषभ पंतने तडाखेबाज फलंदाजी करत धावांचा डोंगर सर केला. पंतने 138 बॉलमध्ये 89 रन्सची धडाकेबाज खेळी केली. पंतच्या या खेळीमुळे भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
ऑस्ट्रेलियाला 400 धावांच्या आत रोखले
भारतासाठी हा सामना आव्हानात्मक होता. कारण भारताकडे कोणताही अनुभव बॉलर नव्हता. मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, टी. नटराजन, वाशिंग्टन सुंदर या बॉलरर्सनी भेदक मारा करून 369 धावांवर कांगारूंना रोखले. पहिल्या इनिंगमध्ये शार्दुल ठाकुर, टी. नटराजन आणि वाशिंग्टन सुंदर ने 3-3 विकेट घेतल्या
युवा जोडीचा कमाल
भारतीय टीम बॅटिंगसाठी मैदानात उतरली तेव्हा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक मारा करून ओपनिंग जोडी मागे पाठवली पण त्यानंतर गोलंदाज असलेल्या वाशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकुर या जोडीने शानदार बॅटिंग करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
वाशिंग्टन सुंदरने 62 रन आणि शार्दुल ठाकुरने 67 रन्स केले. दोघांच्या या दमदार खेळीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन टीमने दिलेल्या लीडच्या 30 रन्सजवळ येऊन पोहोचली.
मोहम्मद सिराजची कमाल
दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने भारतासमोर मोठी धावसंख्या उभी करण्याची रणनीती आखली होती. पण मोहम्मद सिराजने शानदार बॉलिंग करून कांगारूंच्या स्वप्नावर पाणी फेरले. सिराजने 73 रन्स देऊन 5 विकेट घेतल्यात. त्याशिवाय शार्दुल ठाकुरने चार विकेट घेऊन कांगारूचं कंबरडं मोडलं.
चेतश्वर पुजारा द वॉल
दुसऱ्या इनिंगमध्ये भारतासमोर विजयासाठी 328 धावांचे लक्ष होते. तेव्हा चेतश्वर पुजाराने दमदार खेळी करत मैदान गाजवले. कांगारूच्या भेदक माऱ्यापुढे तो टिकून होता. त्यामुळेच भारतीय संघाने सामन्यावर पकड मिळवली. पुजाराने 211 बॉलमध्ये 56 धावा केल्या.