ऍडलेड, 17 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) ला सुरुवात झाली आहे. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ओपनर पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी ठरला आहे. मॅचच्या दुसऱ्याच बॉलला शॉ शून्य रनवर आऊट झाला. गेल्या काही महिन्यांपासून पृथ्वी शॉ फॉर्मसाठी झगडत आहे. आयपीएलमध्येही त्याला खराब कामगिरीमुळे दिल्लीच्या टीमने बाहेर बसवलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही पृथ्वी शॉ अपयशी ठरला.
सराव सामन्याच्या 4 इनिंगमध्ये पृथ्वी शॉने एकूण 62 रन केले होते. तर शुभमन गिलने या 4 मॅचमध्ये 137 रन केले, तरीही विराट कोहलीने शुभमन गिलऐवजी पृथ्वी शॉ याला संधी दिली. यावर विराट कोहलीने भाष्य केलं आहे.
'पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल हे दोघंही प्रतिभावान खेळाडू आहेत, म्हणूनच ते इकडे आहेत. शुभमनला टेस्टमध्ये अजून संधी मिळालेली नाही, पण त्याला पाहणं औत्सुक्याचं राहिल, कारण त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे. पृथ्वी शॉने या स्तरावर कामगिरी केली आहे, पण तो ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच खेळेल. खेळामध्ये त्याने केलेली प्रगती बघण्यासाठी मी उत्साही आहे,' असं विराट म्हणाला.
टीमच्या वरिष्ठ खेळाडूंना पुढे येऊन जबाबदारी स्वीकारावी लागेल, असं वक्तव्य विराटने केलं. पहिली टेस्ट मॅच संपल्यानंतर विराट भारतात परतणार आहे. विराटच्या गैरहजेरीमध्ये अजिंक्य रहाणे उरलेल्या तीन मॅचमध्ये भारताचं नेतृत्व करेल.