ऍडलेड, 20 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा (India vs Australia) 8 विकेटने दारूण पराभव झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा फक्त 36 रनवर ऑल आऊट झाला. टेस्ट क्रिकेटमधला टीम इंडियाचा हा निच्चांकी स्कोअर आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सपशेल अपयशी ठरला. पृथ्वी शॉच्या बॅटिंगवर चौफेर टीका होत आहे. ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू शेन वॉर्न (Shane Warne) याने पृथ्वी शॉच्या तंत्रावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
'जो बर्न्सने काल संघर्ष केला, यात काहीच आश्चर्य नाही, कारण तो खराब फॉर्ममध्ये होता. पण पृथ्वी शॉ या तंत्राने या स्तराच्या क्रिकेटमध्ये संघर्ष करेल,' असं शेन वॉर्न म्हणाला.
ऍडलेडच्या मैदानात झालेल्या या मॅचमध्ये पृथ्वी शॉ दोन्ही इनिंगमध्ये बोल्ड झाला. भारताने या मॅचमध्ये केएल राहुल आणि शुभमन गिलच्याऐवजी शॉला संधी दिला, पण पहिल्या इनिंगमध्ये तो शून्य रनवर आणि दुसऱ्या इनिंगमध्ये चार रनवर आऊट झाला.
दुसऱ्या इनिंगमध्ये भारताला 53 रनची आघाडी मिळाली होती, पण शॉला दुसऱ्या संधीचंही सोनं करता आलं नाही. पॅट कमिन्सने त्याला बोल्ड केलं, त्याआधी पहिल्या इनिंगमध्ये स्टार्कने शॉला आऊट केलं होतं. संपूर्ण मॅचमध्ये शॉला फक्त 6 बॉल खेळता आले.
आयपीएलमध्येही पृथ्वीचा संघर्ष
आयपीएलच्या (IPL 2020) या मोसमातही दिल्ली (Delhi Capitals) कडून खेळलेल्या पृथ्वी शॉने सुरुवातीला धमाकेदार कामगिरी केली, पण यानंतर मात्र त्याला अपयश आलं. काही मॅचनंतर टीमने पृथ्वी शॉला बाहेरही बसवलं. ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या सराव सामन्यातही पृथ्वी शॉने निराशा केली. शॉचा सध्याचा फॉर्म बघता त्याच्याऐवजी शुभमन गिलला संधी मिळू शकते. गिलने ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या सराव सामन्यात शानदार अर्धशतक केलं.