IND vs AUS : पहिल्या टेस्टमध्ये पंत खेळणार का साहा? संजय मांजरेकर म्हणतात...
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला 17 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. पहिल्या टेस्टमध्ये विकेट कीपर म्हणून ऋषभ पंत (Rishabh Pant) ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यांच्यापैकी कोणाला खेळवावं, याबाबत संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी मत मांडलं आहे.
मुंबई, 13 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला 17 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे, पण अजूनही पहिल्या टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कोणाला संधी देणार, याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. टीम इंडियाचे चाहते आणि समिक्षक याबाबत त्यांचं मत मांडत आहेत. विकेट कीपर म्हणून विराटकडे ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या दोघांपैकी कोणाला संधी देण्यात यावी, याबाबत माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी त्यांचं मत मांडलं आहे.
ऋद्धीमान साहा याला ऍडलेड टेस्टमध्ये संधी मिळाली पाहिजे, असं मांजरेकर म्हणाले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये विकेट कीपरची निवड त्याच्या विकेट कीपिंगच्या कौशल्यावर झाली पाहिजे. स्टीव्ह स्मिथसारख्या बॅट्समनचा कॅच सोडला तर तो 200 रन करतो, त्यामुळे साहा याला संधी मिळाली. ऑस्ट्रेलियात फास्ट बॉलरसमोर चांगल्या विकेट कीपरची गरज आहे, त्यामुळे साहाला टीममध्ये घेतलं पाहिजे, असं ट्विट मांजरेकर यांनी केलं आहे.
In Tests always keeping skills first. Drop a Steve Smith early and he gets a 200! So Saha. Also need a better keeper against pace in Australia. Again Saha. https://t.co/R0udBBCr04
टेस्ट सीरिजआधी ऋद्धीमान साहा आणि ऋषभ पंत यांनी त्यांची दावेदारी समोर ठेवली आहे. सिडनीमध्ये झालेल्या पहिल्या सराव सामन्यात साहाने अर्धशतक केलं होतं. तर दुसऱ्या सराव सामन्यात ऋषभ पंतने धमाकेदार शतक केलं. पंतने 73 बॉलमध्ये 9 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीने शतकाला गवसणी घातली.
मागच्या दोन वर्षांमध्ये पंत आणि साहा यांच्यात टेस्ट क्रिकेटमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. न्यूझीलंड दौऱ्यामध्ये पंत अपयशी ठरला होता, त्याने 4 इनिंगमध्ये फक्त 60 रन केले होते. तर मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतने 58 च्या सरासरीने 7 इनिंगमध्ये 350 रन केले होते. यानंतर पंतची बॅट चालली नाही. तर 37 टेस्ट खेळलेला ऋद्धीमान साहा मैदानात टिकून बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो. याशिवाय साहा याची कीपिंगही पंतपेक्षा चांगली आहे.