कॅनबेरा, 4 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली तीन मॅचची वनडे सीरिज ऑस्ट्रेलियाने 2-1 ने जिंकली. यानंतर झालेल्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. पण या मॅचवेळी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) वरुन वाद झाला. यावरुन ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर (Justin Langer) यांनी थेट मॅच रेफ्री डेव्हिड बून (David Boon) यांच्याशी पंगा घेतला.
या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि भारताला 20 ओव्हरमध्ये 161-7 वर रोखलं. या मॅचमध्ये रविंद्र जडेजा हा पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावून आला. जडेजाने 44 रनची खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. बॅटिंग करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजाच्या हेल्मेटला बॉल लागला, यानंतर तो फिल्डिंगसाठी मैदानात उतरला नाही. जडेजाऐवजी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) बॉलिंगला उतरल्यामुळे जस्टिन लॅन्गर यांनी आक्षेप घेतला.
भारताची बॅटिंग सुरू असताना शेवटच्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कने टाकलेला दुसरा बॉल जडेजाच्या हेल्मेटला लागला. एका ओव्हरआधीच जडेजाच्या उजव्या पायालाही दुखापत झाली होती, तेव्हाच जडेजा फिल्डिंगला येणार नाही, असं वाटत होतं. त्यामुळे युझवेंद्र चहलला जडेजाचं कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात उतरवलं.
It took four matches but the summer has had its first blow up...
It was between Justin Langer and match referee David Boon DETAILS >>> https://t.co/O4Cw2RrWEQ #AUSvIND pic.twitter.com/MUS3PT0Ogp
— Fox Cricket (@FoxCricket) December 4, 2020
रविंद्र जडेजाऐवजी युझवेंद्र चहलच्या बॉलिंग करण्यावर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर यांनी आक्षेप घेतले. यावेळी लॅन्गरने मॅच रेफ्री डेव्हिड बून यांच्यासोबत हुज्जतही घातली. हेल्मेटला बॉल लागल्यावर जडेजाने त्यावेळी टेस्ट घेतली नाही आणि इनिंग सुरू ठेवली. शेवटच्या तीन बॉलवर त्याने 9 रन केले. त्यामुळे जडेजाऐवजी चहलच्या बॉलिंग करण्याबाबत लॅन्गरने नाराजी जाहीर केली. कनकशन नियमानुसार बदली खेळाडू हा त्याच्यासारखाच म्हणजेच बॉलरला कनकशन दुखापत झाली तर बॉलरच बदली खेळाडू किंवा बॅट्समनला दुखापत झाली तर बॅट्समनच बदली खेळाडू असावा. पण जडेजा ऑलराऊंडर असल्यामुळे आणि नियमांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे भारताने नियमाचा फायदा घेत चहलला मैदानात उतरवलं. बीसीसीआयची मेडिकल टीम सध्या जडेजासोबत आहे.
जडेजाने या मॅचमध्ये आक्रमक खेळी करत 23 बॉलमध्ये 44 रन केले. भारताने 11 ते 15 ओव्हरदरम्यान 22 रनमध्येच तीन विकेट गमावल्या. संजू सॅमसन 15 बॉलमध्ये 23 रन, मनिष पांडे 8 बॉलमध्ये 2 रन करून आऊट झाले, तर राहुलही अर्धशतक करून माघारी गेला. जडेजा मात्र एका बाजूने किल्ला लढवत होता. त्याने जॉस हेजलवूड आणि मिचेल स्टार्कच्या शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 34 रन काढले.