मेलबर्न, 30 डिसेंबर : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) च्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 8 विकेटने दारूण पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियाला डबल धक्का लागला आहे. धीम्या ओव्हर गतीमुळे ऑस्ट्रेलियन टीमला आयसीसीने मॅच फीच्या 40 टक्के दंड लावला आहे. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही ऑस्ट्रेलियाचं 4 पॉईंट्सचं नुकसान झालं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या टीमने निर्धारित वेळेत दोन ओव्हर कमी टाकल्या, त्यामुळे कर्णधार टीम पेनला मॅच रेफ्री डेव्हिड बून यांनी ही शिक्षा सुनावण्यात आली. आयसीसीच्या नियम 2.22 नुसार प्रत्येक धीम्या ओव्हर गतीसाठी टीमला 20 टक्के दंड आकारला जातो. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या नियमांनुसार प्रत्येक टीमला प्रत्येक कमी ओव्हर टाकण्यासाठी दोन अंकांचं नुकसान होतं, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधले 4 पॉईंट कमी करण्यात आले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने ही शिक्षा स्वीकारल्यामुळे पुढे सुनावणी घेण्यात आली नसल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं. मैदानातले अंपायर ब्रुक्स ऑक्सेमफर्ड आणि पॉल रायफल, थर्ड अंपायर पॉल विलसन आणि चौथे अंपायर गेरार्ड एबूड यांनी लावले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर भारताने जोरदार पुनरागमन करत दुसरा सामना 8 विकेटने जिंकला. सीरिजची तिसरी टेस्ट 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळवली जाणार आहे.