मुंबई, 12 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याची टेस्ट टीममध्ये निवड करण्यात आली नाही. टी-20 सीरिज संपल्यानंतर हार्दिक पांड्या भारतात परतला. फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिक पांड्याला टेस्ट सीरिजसाठी का ठेवण्यात आलं नाही? असा प्रश्न अनेकांना पडला. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानेही याबाबत त्याचं मत मांडलं आहे.
जर हार्दिक पांड्या बॉलिंग करणार असेल, तर तो टेस्ट टीमचा भाग असेल, असं सेहवाग म्हणाला. 'बॉलिंग करण्यासाठी मी फिट नसल्यामुळे टेस्ट टीममध्ये माझी निवड करू नका, असं हार्दिक पांड्याने सांगितलं असेल. तो फक्त वनडे आणि टी-20 क्रिकेट खेळेल,' असं सेहवाग सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना म्हणाला.
पांड्या जेव्हा बॉलिंगला सुरुवात करेल, तेव्हा तो टेस्टमध्ये पुन्हा दिसेल, अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 सीरिज 2-1 ने जिंकली, यामध्ये पांड्याने मोलाची भूमिका बजावली. टी-20 सीरिजमध्ये पांड्याला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. वनडे आणि टी-20 मध्ये सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर पांड्या ज्यापद्धतीने आक्रमक बॅटिंग करतो, तशीच बॅटिंग त्याने टेस्टमध्ये केली, तर भारत टेस्ट जिंकण्याच्या स्थितीमध्ये येऊ शकतो.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये हार्दिक पांड्याने धमाकेदार कामगिरी केली. वनडे सीरिजमध्ये हार्दिकने 90, 28 आणि नाबाद 92 रनची खेळी केली. तर टी-20 सीरिजमध्ये त्याने 16, नाबाद 42 आणि 20 रन केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी आयपीएलमध्येही हार्दिक पांड्याने धडाकेबाज कामगिरी केली होती. मुंबईला पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवण्यात हार्दिक पांड्याची भूमिका महत्त्वाची होती.