मुंबई, 21 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून भारतात परतलेल्या टीम इंडियाच्या (India vs Australia) खेळाडूंचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ने केक कापला, यावेळी त्याच्यासोबत रोहित शर्मा (Rohit Sharma), टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri), ब्रिस्बेन टेस्ट गाजवणारा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) होते.
काल ऑस्ट्रेलियावरून निघालेले भारतीय खेळाडू दुबईमार्गे मुंबईमध्ये दाखल झाले. दुबईवरून येत असले तरी त्यांना क्वारंटाईनच्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यामुळे युरोप, दक्षिण आफ्रिका आणि मध्य-पूर्व देशांमधून येणाऱ्या नागरिकांसाठी कठोर नियम करण्यात आले आहेत. या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन आणि 7 दिवस घरीच क्वारंटाईन व्हावं लागतं, पण मुंबई महापालिकेने टीम इंडियाच्या या खेळाडूंना खास सवलत दिली आहे.
ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंचं मुंबई विमानतळावर स्वागत, अजिंक्य रहाणेने कापला केक#IndiavsAustralia @ajinkyarahane88 pic.twitter.com/3RXNSdAhut
— News18Lokmat (@News18lokmat) January 21, 2021
भारतीय खेळाडूंना मुंबईमध्ये क्वारंटाईन व्हावं लागलं असतं तर त्यांना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये सहभागी होता आलं नसतं, कारण 5 फेब्रुवारीपर्यंत त्यांना क्वारंटाईन व्हावं लागलं असतं. भारत आणि इंग्लंड यांच्यातली टेस्ट सीरिजही 5 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यासाठी भारतीय टीम 27 जानेवारीला बायो-बबलमध्ये जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये भारताचा मानहानीकारक पराभव झाला, ऍडलेडमध्ये झालेल्या या टेस्टमध्ये भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाला. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा निचांकी स्कोअर होता. यानंतर विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी भारतात परतला, त्यामुळे अजिंक्य रहाणेकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं आणि मग भारताने मागे वळून पाहिलं नाही. मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये रहाणेने शतक केलं, ज्यामुळे भारताचा विजय झाला. सिडनीच्या तिसऱ्या टेस्टमध्ये दुखापती झालेल्या असतानाही भारतीय टीमने संघर्ष करत टेस्ट ड्रॉ केली आणि ब्रिस्बेनमध्ये अशक्य वाटणारा विजय मिळवला. लागोपाठ दुसऱ्यांदा भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत पराभव करण्याचा पराक्रम भारतीय टीमने केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या विजयाला जास्त महत्त्व प्राप्त झालं कारण भारतीय टीमला दुखापतींचं ग्रहण लागलं होतं. या सीरिजमध्ये भारताने दुखापतीमुळे तब्बल 20 खेळाडू वापरले. मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, हनुमा विहारी, केएल राहुल हे खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाले, तर इशांत शर्माला दुखापतीमुळेच ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावं लागलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.