कॅनबेरा, 3 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने भारताविरुद्ध (India vs Australia) तिसऱ्या वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो ऑस्ट्रेलियाचा वनडे क्रिकेट खेळणारा 230वा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने टोपी दिली. ग्रीन जेव्हा मैदानात खेळण्यासाठी आला तेव्हा तो घाबरला होता, मॅच संपल्यानंतर ग्रीननेच हे सांगितलं. बॅटिंगला आलो तेव्हा विकेट कीपिंग करणारा केएल राहुल (KL Rahul) जे बोलला ते मी कायम लक्षात ठेवेन, असं ग्रीन म्हणाला.
'केएल राहुल विकेट मागे जबरदस्त आहे. मी बॅटिंगला आलो तेव्हा त्याने मला तू घाबरला आहेस का? असं विचारलं. मीदेखील त्याला हो असं उत्तर दिलं. यानंतर त्याने मला मुला चांगला खेळ, असं म्हणत प्रोत्साहन दिलं. राहुलचं हे वागणं कायम लक्षात ठेवेन,' अशी प्रतिक्रिया ग्रीनने दिली.
भारतासारखे उत्कृष्ठ स्पिनर मी कुठेही बघितले नाहीत. मैदानाबाहेर तुम्ही कितीही अभ्यास केलात किंवा त्यांच्या बॉलिंगचे व्हिडिओ बघितलेत तरीही मैदानात त्यांचा सामना करणं कठीण असल्याचं ग्रीन म्हणाला. 303 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ग्रीन पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला उतरला होता, पण 21 रन करून तो आऊट झाला. या खेळीमध्ये ग्रीनने एक फोर आणि एक सिक्स मारली. सोबतच त्याने 4 ओव्हर बॉलिंग करून एकही विकेट घेतली नाही.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने विराट कोहली बॅटिंग करत असताना कॅमरून ग्रीनला बॉलिंग दिली. विराटला बॉलिंग करताना तो का सर्वोत्कृष्ट आहे, हे समजलं. विराटने माझ्या बॉलिंगचा उत्तम सामना केला, असं वक्तव्य ग्रीनने केलं.