मुंबई, 26 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा (India vs Australia) 2-1 ने ऐतिहासिक विजय झाला. दुखापतींमुळे महत्त्वाचे खेळाडू खेळत नसतानाही भारताने दिमाखदार कामगिरी केल्यामुळे क्रिकेटपटू आणि चाहतेही टीमचं कौतुक करत आहेत. ब्रिस्बेनमधल्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा 3 विकेटने रोमांचक विजय झाला, यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) आनंदी झाले. या विजयानंतरचा रंजक किस्सा गावसकर यांनी सांगितला आहे.
ऑस्ट्रेलियात चॅनल-7 च्या कॉमेंट्री टीममध्ये सुनिल गावसकर होते. ब्रिस्बेनमधल्या भारताच्या विजयानंतर फक्त गावसकर यांनीच जल्लोष केला नाही, तर वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लाराही (Brian Lara) यामध्ये सामील झाला. ब्रायन लाराने मॅचनंतर चॅनल-7 च्या पार्टीमध्ये आपल्याला मिठी मारली आणि आपण जिंकलो, अशी प्रतिक्रिया दिल्याचं गावसकर यांनी सांगितलं. या सीरिजमधले क्षण आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील, असंही लारा म्हणाल्याची प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या दिवसापासून गावसकर तिकडे होते. ऍडलेड टेस्टमध्ये 36 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर टीम इंडियावर जोरदार टीका झाली. टेस्ट क्रिकेटमधला टीम इंडियाचा हा निचांकी स्कोअर होता.
ऍडलेडमधल्या या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली भारतात परतला, त्यामुळे अजिंक्य रहाणेकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं.
अजिंक्य कर्णधार झाल्यानंतर टीमने मागे वळून बघितलं नाही. मेलबर्नमध्ये भारताने दमदार पुनरागमन करत सीरिजमध्ये बरोबरी केली. तर सिडनीमध्ये झुंजार खेळी करत सामना ड्रॉ करण्यात भारताला यश आलं. यानंतर ब्रिस्बेनमध्ये शेवटचे काही बॉल शिल्लक असताना भारताने रोमांचक विजय मिळवला. 32 वर्षानंतर गाबाच्या मैदानात ऑस्ट्रेलियाचा पराभव झालं. तसंच लागोपाठ दुसऱ्यांदा भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.