मेलबर्न, 21 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) 8 विकेटने दारूण पराभव झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा फक्त 36 रनवर ऑल आऊट झाला. टेस्ट क्रिकेटमधली भारताची ही निच्चांकी धावसंख्या आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर आता दुसऱ्या टेस्ट मॅचला 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या मॅचपासून उरलेल्या टेस्ट सीरिजमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारताचं नेतृत्व करेल. विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर गेल्यामुळे रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपावण्यात आली आहे. पण अजिंक्य रहाणेपुढे मोठी आव्हानं उभी ठाकली आहेत.
ओपनिंग जोडी
परदेश दौऱ्यावर टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीला वारंवार अपयश येत आहे. मयंक अगरवाल आणि पृथ्वी शॉ यांना टीम इंडिया ओपनिंगला खेळत आहे, पण पृथ्वी शॉ याला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे नवा ओपनर म्हणून केएल राहुलला खेळवायचं का पृथ्वी शॉवर विश्वास दाखवायचा हा प्रश्न रहाणेपुढे असेल.
विराटशिवाय मधल्या फळीचा संघर्ष
विराटच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय टीम आता खेळणार असल्यामुळे त्यांच्यावर आणखी दबाव असेल. पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येही विराट कोहलीची विकेट गेल्यानंतर भारतीय टीम पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.
रहाणेचा फॉर्म
अजिंक्य रहाणेपुढे त्याचा स्वत:चा फॉर्मही चिंतेचा विषय असेल. मागच्या दोन वर्षांमध्ये रहाणेची कामगिरी त्याच्या नावाला साजेशी झालेली नाही. आयपीएलमध्येही दिल्लीकडून त्याला फार खेळायची संधी मिळाली नव्हती, त्यामुळे विराटच्या गैरहजेरीत टीमसाठी आणि स्वत:साठी फॉर्ममध्ये यायचं आव्हान अजिंक्यपुढे असेल.
कर्णधारपदाचा दबाव
अजिंक्य रहाणेने आतापर्यंत टेस्टमध्ये दोन वेळा भारताचं नेतृत्व केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि अफगाणिस्तानविरुद्ध घरच्या मैदानात रहाणे भारताचा कर्णधार होता. या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये भारताचा विजय झाला होता, पण आताची परिस्थिती वेगळी आहे. पहिल्या मॅचमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर रहाणेवर कर्णधारपदाचा दबाव असेल.
कोणत्या बॉलरला संधी?
मागच्या दोन वर्षातला टेस्ट क्रिकेटमधला भारताचा सगळ्यात यशस्वी बॉलर राहिलेला मोहम्मद शमी पहिल्या टेस्टदरम्यान दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे उरलेल्या सीरिजमधून शमी बाहेर आहे. आता त्याच्याऐवजी कोणाला संधी द्यायची, हा प्रश्न रहाणेला सतावत असेल. सध्या तरी रहाणेकडे मोहम्मद सिराज, नवदीप सैनी आणि टी.नटराजन हे पर्याय उपलब्ध आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.