ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजला गुरूवार (17 डिसेंबर) पासून सुरूवात होणार आहे. पहिल्या टेस्टमध्ये भारतीय फास्ट बॉलर उत्तम कामगिरी करण्यास सज्ज आहेत, पण सर्वांत अनुभवी बॉलर असलेल्या ईशांत शर्माची उणीव भारताला नक्कीच जाणवेल, असं मत उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने व्यक्त केलं आहे. मंगळवारी तो प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार टेस्ट मॅचच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (17 डिसेंबर) ऍडलेडमध्ये होणार असून त्यात भारताचं नेतृत्व विराट कोहली भूषवेल. त्यानंतर कोहली पितृत्व रजेवर जाणार असल्याने उर्वरित तीन सामन्यांत अजिंक्य रहाणे टीमचा कर्णधार असेल.
भारतीय बॉलर घेऊ शकतात 20 विकेट्स
भारताच्या फास्ट बॉलिंगबद्दल बोलताना अजिंक्य म्हणाला, ‘उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे फास्ट बॉलर उत्तम कामगिरी करू शकतात. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी बॉलिंग करायची हे ते जाणतात. भारतीय बॉलरमध्ये एका कसोटीत 20 विकेट्स घेण्याची क्षमता आहे, पण आम्हाला अनुभवी ईशांत शर्माची उणीव नक्की भासेल.’
ईशांत शर्माला आयपीएल स्पर्धेत दुखापत झाल्यामुळे तो टीममध्ये नाही. ‘प्रत्येक खेळाडूकडे संघाला विजय मिळवून द्यायची क्षमता आहे. अनुभवी स्पिनर आर. अश्विन याची भूमिकाही महत्त्वाची ठरू शकते. त्याच्याकडे अनुभव आणि विविधता दोन्ही गोष्टी आहेत. बॉलिंग आणि बॅटिंग दोन्हीमध्ये अश्विन महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो,’अशी प्रतिक्रिया रहाणेने दिली.
गुलाबी बॉलबद्दल काळजी घ्यायला हवी
हा सामना डे-नाईट होणार असल्यामुळे गुलाबी बॉल वापरला जाणार आहे. त्याबद्दल अजिंक्य म्हणाला, ‘आम्ही लाल बॉलने दिवसभर खेळतो, पण गुलाबी बॉलने खेळताना सूर्यास्तावेळी 40 ते 50 मिनिटं बॉलचा वेग अचानकच वाढतो. त्यामुळे बॅट्समनला एकाग्रता करता येत नाही. म्हणू गुलाबी बॉलच्या वेगाबद्दल विशेष सावध रहावं लागेल.’ क्वारंटाइनमध्ये सरावाला परवानगी मिळाल्याने सराव सामने चांगले झाले. आम्ही आता प्रत्यक्ष सामन्यासाठी सज्ज आहोत असंही त्याने सांगितलं.