ब्रिस्बेन, 13 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीम (India vs Australia) मंगळवारी ब्रिस्बेनमध्ये पोहोचली आहे. पण ब्रिस्बेनच्या ज्या हॉटेलमध्ये टीमला ठेवण्यात आलं आहे, तिकडे त्यांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीयेत. टीमच्या या तक्रारीनंतर बीसीसीआय (BCCI) ऍक्शन मोडमध्ये आलं आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि सीईओ हेमांग अमीन यांनी तक्रारी मिळाल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला आहे. यानंतर भारतीय टीमला कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलं आहे.
बोर्डाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं की 'टीमला हॉटेलमध्ये रूम सर्व्हिस किंवा हाऊस कीपिंगची सुविधाही नाही. हॉटेलमध्ये असलेलं जिमही आंतरराष्ट्रीय दर्जाचं नाही. स्विमिंग पूलमध्येही जाता येत नाही. चेक इन करण्याआधी या सगळ्या सुविधांचं आश्वासन देण्यात आलं होतं.'
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या टेस्टला 15 जानेवारीपासून सुरूवात होईल. कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आणि न्यू साऊथ वेल्सच्या सीमेवर लॉकडाऊन असल्यामुळे खेळाडूंसाठी हॉटेलमध्ये क्वारंटाईनचे नियम कडक आहेत. हॉटेलमध्ये खेळाडूंना एकमेकांना भेटता येत आहे. खेळाडूंना एक टीम रूम दिली आहे, जिकडे ते एकमेकांना भेटू शकतात.
सुविधा मिळत नसल्याबद्दल भारतीय टीमने हॉटेल अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, पण दोन्ही टीमसाठी नियम सारखा असल्याचं सांगण्यात आलं. फक्त एकाच टीमसाठी क्वारंटाईनचे नियम कडक नाहीत, असं स्पष्ट करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भारत-ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट सीरिजमधल्या 3 मॅच झाल्या आहेत आणि सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे. पहिली टेस्ट मॅच ऍडलेडमध्ये, दुसरी मेलबर्नमध्ये तर तिसरी सिडनीमध्ये खेळवली गेली. ऍडलेडमध्ये झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला, यानंतर मेलबर्नमधली टेस्ट भारताने 8 विकेटने जिंकली. तर सिडनी टेस्टच्या शेवटच्या दिवशी शानदार कामगिरी करत भारताने तिसरी टेस्ट ड्रॉ केली. सीरिजची शेवटची टेस्ट 15 जानेवारीला होणार आहे.