IND vs AUS : ऑस्ट्रेलियात जिंकल्यानंतर टीम इंडियाला गिफ्ट, BCCI ची मोठी घोषणा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताने (India vs Australia) ऐतिहासिक विजय मिळवला, याचसोबत भारताने 4 टेस्ट मॅचच्या या सीरिजवरही कब्जा केला. टीम इंडियाच्या या कामगिरीवर बीसीसीआय (BCCI) ही चांगलीच खूश झाली आहे.
ब्रिस्बेन, 19 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताने (India vs Australia) ऐतिहासिक विजय मिळवला, याचसोबत भारताने 4 टेस्ट मॅचच्या या सीरिजवरही कब्जा केला. सलग दुसऱ्यांदा भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत लोळवलं आहे. पण यंदाच्या वेळची कामगिरी खास म्हणावी लागेल, कारण विराट कोहलीची अनुपस्थिती, भारतीय खेळाडूंना झालेल्या दुखापती आणि कोरोना लॉकडाऊनमुळे बायो-बबलमध्ये राहणं, या सगळ्या अडचणींवर मात करत भारताने हा इतिहास घडवला.
टीम इंडियाच्या या कामगिरीवर बीसीसीआय (BCCI) ही चांगलीच खूश झाली आहे. या ऐतिहासिक विजयाबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला 5 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. याबाबतचं ट्विट त्यांनी केलं आहे.
The @BCCI has announced INR 5 Crore as team bonus. These are special moments for India Cricket. An outstanding display of character and skill #TeamIndia#AUSvIND#Gabba
या सीरिजच्या पहिल्याच टेस्टमध्ये भारताचा मानहानीकारक पराभव झाला. फक्त 36 रनवरच भारतीय टीम ऑल आऊट झाली. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा सगळ्यात निचांकी स्कोअर होता. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर गेल्यामुळे भारतात आला, तेव्हा कठीण परिस्थितीमध्ये अजिंक्य रहाणेकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं.
दुखापतींमुळे टेस्ट सीरिजमध्ये भारताने तब्बल 20 खेळाडू वापरावे लागले. मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, केएल राहुल, हनुमा विहारी या खेळाडूंना भारताने दुखापतींमुळे गमावलं. तर इशांत शर्मा दुखापतीमुळेच या संपूर्ण दौऱ्याला मुकला. रोहित शर्मादेखील आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या टेस्टपासून उपलब्ध झाला. या सगळ्या अडचणींवर मात करत भारताने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात स्पेशल कामगिरी केली.