ब्रिस्बेन, 19 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs Australia) रोमांचक आणि ऐतिहासिक विजय मिळवला. याचसोबत भारताने चार टेस्ट मॅचची ही सीरिज 2-1 ने जिंकली. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाच्या मायभूमीतला हा सलग दुसरा विजय आहे, याआधी 2018-19 साली भारताने विराटच्या (Virat Kohli) नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच जमिनीवर 2-1 ने पराभव केला होता. यावेळी मात्र विराट पितृत्वाच्या रजेवर गेल्यामुळे पहिल्या टेस्टनंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं. रहाणेनेही कुठेही विराट कोहलीची कमी जाणवून दिली नाही.
अजिंक्य रहाणेने या कामगिरीसोबतच टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना खोटं ठरवलं आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पराभूत करण्याची कामगिरी केली आहे. भविष्यात बराच काळ दुसऱ्या कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी जमणार नाही, असं रवी शास्त्री म्हणाले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टच्या एक दिवसआधीच शास्त्री यांनी हे वक्तव्य केलं होतं.
विराटच्या नेतृत्वात भारताने 2018-19 साली 71 वर्षानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकली होती. भारताने 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला होता. शास्त्री त्यावेळीही टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत टेस्ट सीरिजमध्ये हरवणारी टीम इंडिया आशियातली पहिली टीम ठरली.
टीम इंडियाची कामगिरी
ऍडलेड टेस्टमध्ये टीम इंडियाचा मानहानीकारक पराभव झाला. 36 रनवरच भारतीय टीम ऑल आऊट झाली. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा निचांकी स्कोअर होता. या टेस्टनंतर विराट कोहली पितृत्वाच्या रजेमुळे भारतात परतला, त्यामुळे रहाणेकडे नेतृत्व देण्यात आलं. रहाणेच्या नेतृत्वात भारताने मेलबर्नमधील बॉक्सिंग डे टेस्ट जिंकली, तर सिडनी टेस्ट मॅच ड्रॉ केली, यानंतर पुन्हा एकदा ब्रिस्बेनमध्ये विजय मिळवला.