भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी अ‍ॅडम झाम्पाने दिला विराट सोबतच्या मैत्रीला उजाळा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी अ‍ॅडम झाम्पाने दिला विराट सोबतच्या मैत्रीला उजाळा

अ‍ॅडम झाम्पाने त्याच्या आणि विराट कोहली यांच्यातील मैत्रीपूर्ण नात्याला उजाळा दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी सिडनी इथं पहिला वन-डे सामना खेळवला जाणार आहे. या वेळी आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघातून एकत्र खेळलेले विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अॅडम झाम्पा प्रतिस्पर्धी म्हणून खेळणार असून त्यांच्या कामगिरीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. मात्र अशातच अ‍ॅडम झाम्पाने त्याच्या आणि विराट कोहली यांच्यातील मैत्रीपूर्ण नात्याला उजाळा दिला आहे.

सिडनी मॉर्निंग हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत अ‍ॅडमने विराट हा मैदानावर आणि मैदानाबाहेर कसा वेगळा असतो, हे सांगितलं आहे. दुबईत झालेल्या आयपीएल स्पर्धेत झाम्पा आणि विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातून एकत्र खेळले आहेत. या वेळी आपण विराट कोहलीच्या व्यक्तिमत्त्वाचे जे पैलू पाहिले ते खूप लोकांना माहीत नाहीत, असं झाम्पा म्हणाला.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत झाम्पाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून तीन सामने खेळले. त्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या पहिल्याच दिवशी बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने झाम्पाला अगत्यपूर्वक घरच्यासारखी वागणूक दिली. त्याची आठवण झाम्पाने सांगितली.

‘विराट कोहली मैदानावर दिसतो त्यापेक्षा कितीतरी वेगळा मैदानाबाहेर असतो. खेळताना, प्रशिक्षण देताना तो एकदम खेळात समरस झालेला असतो. त्याला स्पर्धा आवडते आणि इतरांप्रमाणेच त्यालाही पराभव मुळीच आवडत नाही. त्याची विजय मिळवण्याची इच्छा तो आपल्या वागण्यातून इतरांच्या तुलनेत जास्त दर्शवतो; मात्र मैदानावरून बाहेर येताच तो एकदम ‘चिल’ खेळाडू आहे. तो बसमध्ये असताना यूट्यूबवरील क्लिप्स बघून जोरजोरात हसत असतो.

झाम्पा आणि विराट कोहलीमध्ये आता मैत्रीचं नातं फुललेलं दिसत असलं तरी त्यांची पहिली भेट मात्र काहीशी वेगळी होती. झाम्पाने 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं आणि त्यांचा प्रतिस्पर्धी होता बंगळुरू संघ. त्या वेळी कोहलीने आयपीएल सामन्यांमध्ये 973 धावा केल्या होत्या.

सामना सुरू होण्याआधी झाम्पाचा सहकारी केन रिचर्डसन याने ए. बी. डिव्हिलियर्स सोबतचा कोहलीचा फोटो ट्विटरवर टाकला होता. झाम्पाने त्यावर टिप्पणी केली होती, जी विराटने देखील वाचली होती. त्यावर भारतीय चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. प्रत्यक्ष सामना खेळताना, झाम्पाच्या बॉलवर चौका मारत कोहलीने ‘ट्विटर पासून दूर रहा, असा सल्ला देत झाम्पाच्या टिप्पणीला प्रत्युत्तर दिलं होतं.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तीन एकदिवसीय, तीन टी-ट्वेंटी आणि चार कसोटी सामने होणार आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: November 24, 2020, 7:46 AM IST

ताज्या बातम्या