सिडनी, 6 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात टी-20 सीरिज सुरू असली तरी सगळ्यांचं लक्ष 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy)वर आहे. 2018-19 साली पहिल्यांदाच भारत ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकला होता. याचसोबत ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकणारा भारत पहिला आशियाई देश बनला होता. यावेळीही भारताने अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करावी, अशी अपेक्षा चाहत्यांची आहे.
चार टेस्ट मॅचची ही सीरिज सुरू होण्यापूर्वी भारतीय टीमच्या सराव सामन्याला सुरूवात झाली आहे. भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए (India A vs Australia A) यांच्यात सुरू असलेल्या सराव सामन्यात पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेने शतक, तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ने अर्धशतक झळकावलं. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया ए टीमने पुजाराला वेगळीच रणनीती अवलंबून आऊट केलं.
या मॅचमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. भारत ए च्या खराब सुरुवातीनंतर रहाणे आणि पुजारा यांच्यात 76 रनची पार्टनरशीप झाली. पुजाराने जेम्स पॅटिनसनच्या बॉलिंगवर आऊट व्हायच्या आधी 140 बॉलमध्ये 54 रन केले होते. ऑस्ट्रेलियाच्या ए टीमचं नेतृत्व ट्रेव्हिस हेड करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार टीम पेनदेखील या मॅचमध्ये खेळत आहे.
An unusual tactic from Australia A, but it's done the trick to get the massive wicket of Cheteshwar Pujara
WATCH LIVE: https://t.co/bz6aBDzoh4 #AUSAvIND pic.twitter.com/N9hGteHDpB
— cricket.com.au (@cricketcomau) December 6, 2020
मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेस्ट सीरिजमध्ये पुजारा ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक ठरला होता. 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये पुजाराने 521 रन केले होते. यामध्ये एक द्विशतक आणि दोन शतकांचा समावेश होता. मागच्या दौऱ्यात पुजाराला आऊट करणं ऑस्ट्रेलियाला कठीण गेलं होतं. यावेळी मात्र ऑस्ट्रेलिया पुजाराला शॉर्ट पिच बॉलिंगचा जास्त वापर करेल, असंच दिसत आहे.
सराव सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया एने पुजाराला शॉर्ट पिच बॉलिंग टाकली आणि शॉर्ट फाईन लेगला फिल्डर ठेवला होता. ऑस्ट्रेलियाच्या या रणनीतीमध्ये पुजारा अडकला आणि कॅच देऊन बसला.
दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत ए ने 8 विकेट गमावून 237 रन केले होते. रहाणे 228 बॉलमध्ये 108 रनवर नाबाद खेळत आहे. रहाणने कुलदीप यादवसोबत सातव्या विकेटसाठी 69 रनची पार्टनरशीप करत भारत ए चा स्कोअर 200 च्या पुढे नेला. नऊ महिन्यानंतर क्रिकेट खेळणाऱ्या पुजाराला फॉर्म गवसायला फार वेळ लागला नाही. पुजाराने त्याच्या इनिंगमध्ये 5 फोर मारले.
मांसपेशीच्या दुखापतीनंतर पुनरागमन करणारा विकेट कीपर ऋद्धीमान सहा एकही रन न करता आऊट झाला. सराव सामन्यासाठी भारताने ऋषभ पंतला बाहेर बसवलं आहे. आयपीएलमध्ये मुंबईच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जेम्स पॅटिनसनने तीन विकेट घेतल्या, तर मायकल नेसरला दोन आणि बर्डला एक विकेट मिळाली. कर्णधार ट्रेव्हिस हेडने आपल्या ऑफ स्पिनने दोन विकेट घेतल्या.