ब्रिस्बेन, 15 जानेवारी : टेस्ट क्रिकेटमध्ये नेहमीच अनुभवाला महत्त्व दिलं जातं. प्रत्येक कर्णधार टीममध्ये अनुभव असलेल्या खेळाडूलाच संधी देतो, पण टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) चौथ्या टेस्टमध्ये मागच्या 6 दशकातली सगळ्यात कमी अनुभवी टीम मैदानात उतरवली आहे. टीम इंडियाचे बरेच खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत, त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळत आहे.
या टेस्टमध्ये हनुमा विहारी जसप्रीत बुमराह, आर.अश्विन, रवींद्र जडेजा यांना दुखापतीमुळे संधी मिळाली नाही, त्यांच्याऐवजी मयंक अगरवाल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, टी नटराजन यांना संधी मिळाली आहे. यातल्या सुंदर आणि नटराजन यांची ही पहिलीच टेस्ट मॅच आहे. या खेळाडूंची टीममध्ये निवड होताच भारताने 75 वर्ष जुनं रेकॉर्ड मोडलं आहे.
टीम इंडियाने या सीरिजमध्ये तब्बल 20 खेळाडूंना संधी दिली आहे. 1960 नंतर पहिल्यांदाच असं झालं आहे. या टेस्ट सीरिजमध्ये फक्त अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा सगळ्या मॅच खेळले आहेत. तर पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांनी एकतरी मॅच खेळली आहे.
अनुभवहिन बॉलिंग
ब्रिस्बेन टेस्टमधली भारताची बॉलिंग अनुभवहिन आहे. या मॅचमध्ये खेळत असलेल्या सगळ्या भारतीय बॉलर्सकडे फक्त 4 टेस्टचा अनुभव आहे. वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन यांचा हा पहिलाच सामना आहे, तर शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनीला फक्त एकाच मॅचचा अनुभव आहे. मोहम्मद सिराजची ही तिसरी टेस्ट आहे.
तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या 5 बॉलर्सचा अनुभव एकूण 249 टेस्टचा आहे. ब्रिस्बेन टेस्टमध्ये खेळत असलेल्या भारतीय बॉलरनी एकूण 13 विकेट घेतल्या आहेत. 1946 नंतर पहिल्यांदाच भारतीय टीम एवढ्या कमी अनुभवी बॉलर्ससह मैदानात उतरली आहे. या सीरिजमध्ये भारताच्या 5 खेळाडूंनी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. याआधी 1996 साली असं झालं होतं. 1996 साली इंग्लंड दौऱ्यात सुनिल जोशी, पारस म्हाम्ब्रे, वेंकटेश प्रसाद, विक्रम राठोड, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
भारताच्या बॉलिंगकडे अनुभव नसला तरी त्यांनी सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियापुढे अडचणी निर्माण केल्या होत्या. वॉर्नर आणि हॅरिस यांना सिराज शार्दुलने लगेच माघारी पाठवलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.