IND vs AUS : टीम इंडियाने केली कांगारूंची शिकार, 7 विकेटनं सामना जिंकत मिळवला मालिका विजय

IND vs AUS : टीम इंडियाने केली कांगारूंची शिकार, 7 विकेटनं सामना जिंकत मिळवला मालिका विजय

2019मध्ये ऑस्ट्रेलियानं जिंकलेल्या मालिकेचा टीम इंडियानं काढला वचपा.

  • Share this:

बंगळुरू, 19 जानेवारी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात तिसऱ्या सामन्यात विराटसेनेनं दणदणीत विजय मिळवला. विकेटनं तिसरा सामना जिंकत भारतानं ही मालिका 2-1नं आपल्या खिशात घातली. यात रोहित शर्मानं 119 तर विराट कोहलीनं 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर, श्रेयस अय्यरनं 35 चेंडूत 44 धावा करत फिनीशरची भुमिका योग्यपणे निभावली. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 287 धावांच्या आव्हानाचा पाठलाग 47.3 ओव्हरमध्ये करत आणखी एक मालिका विजय भारताला मिळवून दिला. दरम्यान याआधी भारतानं मुंबईत झालेला पहिला सामना गमावला होता. त्यानंतर कमबॅक करत सलग दोन सामने जिंकत ही मालिकाही आपल्या ताब्यात घेतली.

ऑस्ट्रेलियानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत असताना रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात केली. केएल राहुल 19 धावांवर बाद झाल्यानंतर रोहित आणि विराटनं भारताला विजयाच्या दिशेने घेऊन गेले.

तत्पूर्वी, प्रथम टॉस जिंकत ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यात स्मिथच्या 131 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 50 ओव्हरनंतर भारताला 287 धावांचे आव्हान दिले. तर भारताकडून मोहम्मद शमीनं भेदक मारा करत 4 विकेट घेतल्या. तर, रवींद्र जडेजानं 2 आणि नवदीप सैनी, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या.

मात्र पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला या सामन्यात विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. शमीनं वॉर्नरला केवळ 3 धावा करत माघारी धाडले. त्यानंतर स्मिथ आणि अरॉन फिंच यांच्यातील विसंवादामुळं फिंचला विकेट गमवावी लागली. 19 धावा करत फिंचला धावबाद करण्यात आले. फिंच बाद झाल्यानंतर स्मिथ आणि लाबूशेन यांनी यशस्वी शतकी भागिदारी करत ऑस्ट्रेलियाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहचवले.

भारताने जिंकली सलग 6वी मालिका

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 12 मालिका खेळल्या गेल्या आहेत. यातील 6 मालिका भारतानं तर 6 ऑस्ट्रेलियानं जिंकल्या आहेत. दोघांमध्ये शेवटची मालिका मार्च 2019मध्ये खेळवण्यात आली होती. ही मालिका ऑस्ट्रेलियानं 3-2ने जिंकली होती. दरम्यान यंदा झालेल्या मालिकेत मागच्या पराभवाचा वचपा काढत 2-1ने ही मालिका जिंकली.

रोहितनं सर्वात जलद पार केला 9 हजारांचा टप्पा

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने 9 हजार धावा पूर्ण केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9 हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा जगातील तिसरा वेगवान खेळाडू आहे. हा आकडा गाठण्यासाठी रोहितने 217 सामने खेळले. याआधी विराटनं 194 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. त्यामुळं सर्वात वेगवान 9 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्यापाठोपाठ एबी डिव्हिलियर्सने 208 डावांमध्ये ही कामगिरी केली. विशेष म्हणजे रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीची सुरूवात अत्यंत संथ शैलीने केली होती. रोहितने 82 डावांमध्ये 2000 वनडे धावा पूर्ण केल्या. 2000 धावा पूर्ण करणारा तो तिसरा सर्वात कमी गतीनं धावा करणारा भारतीय खेळाडू होता. यानंतर रोहित शर्माने धावांची भागीदारी केली आणि पुढच्या 7 हजार धावा खूप वेगात केल्या.

भारतीय संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), अ‍ॅलेक्स केरी (यष्टिरक्षक), पॅट्रिक कमिन्स, अ‍ॅश्टॉन अगर, पीटर हँड्सकोम्ब, जोश हॅझलवूड, मार्नस लबूशेन, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टॉन टर्नर, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 01:06 PM IST

ताज्या बातम्या