जोहान्सबर्ग, 19 डिसेंबर : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय टीम सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमध्ये 26 डिसेंबरपासून 3 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय टीम जोरदार सरावही करत आहे. पण क्रिकेट साऊथ आफ्रिकाने (CSA) घेतलेल्या निर्णयामुळे टेस्ट सीरिजवर संकट ओढावलं आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे क्रिकेट साऊथ आफ्रिकाने 4 दिवसीय स्थानिक स्पर्धेच्या उरलेल्या मॅच स्थगित केल्या आहेत.
सीएसएच्या अधिकाऱ्याने अधिकृत प्रतिक्रिया देत सांगितलं, 16-19 डिसेंबरच्या (डिव्हिजन 2) आणि 19-22 डिसेंबरच्या (डिव्हिजन 1) च्यामध्ये होणाऱ्या पाचव्या राऊंडच्या मॅच स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सामने बायो-बबलमध्ये होणार नव्हते, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या सामन्यांना स्थगित करण्यात आलं आहे, ते पुढच्या वर्षी होणार आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातली पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून सेन्चुरियन, दुसरी टेस्ट 3-7 जानेवारीला जोहान्सबर्गमध्ये आणि तिसरी टेस्ट 11-15 जानेवारीला न्यूलंड्स केपटाऊनमध्ये होणार आहे. सेन्चुरियन आणि जोहान्सबर्गमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे क्रिकेट साऊथ आफ्रिका कोणताही धोका पत्करण्यासाठी तयार नाही.
गेल्या काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचे दिवसाला 25 हजार रुग्ण सापडत आहेत. दक्षिण आफ्रिकेत जवळपास 45 टक्के लोकसंख्येला कोरोनाचा पहिला डोस देऊन झाला आहे, त्यामुळे ओमायक्रॉन व्हेरियंट फार धोकादायक ठरणार नाही, अशी अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South africa, Team india