दिल्ली, 12 फेब्रुवारी : भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे निवड समिती अध्यक्ष असलेल्या अमित भंडारी यांच्यावर अज्ञात गुंडांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी घडली. सेंट स्टीफन्स मैदानावर झालेल्या 23 वर्षांखालील निवड चाचणी सामन्यादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला.
भंडारी यांचा दोघांशी वाद झाला होता. त्यानंतर हॉकी स्टिकसह चेन आणि इतर वस्तू घेऊन आलेल्या 15 जणांनी भंडारी यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला आणि कानाला दुखापत झाली. मारहाणीनंतर अमित भंडारींच्या सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं.
दिल्लीतील सेंट स्टीफन्स मैदानावर 23 वर्षाखालील सराव सामने सुरू आहेत. यावेळी दोघेजण अमित भंडारी यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्याशी अमित भंडारींचा वाद झाला. त्यावेळी त्यांना गोळी मारून ठार करण्याची धमकी देण्यात आल्याचे संघ व्यवस्थापक शंकर सैनी यांनी सांगितले.
भंडारी यांच्या हल्ल्यामागे २३ वर्षीय संघात स्थान न मिळाल्याचा राग असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी या हल्ल्यात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच हल्लेखोरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने या हल्ल्यास जबाबदार असलेल्या खेळाडूवर आजीवन बंदी घालण्याची मागणी केली आहे. देशाच्या राजधानीत अशा घटना घडणे दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा